कोरोनाबाधितांसाठी आयएमएतर्फे "मिशन ह्युमॅनिटी'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मे 2020

इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे "कोव्हिड-19'च्या संसर्गाच्या काळात "मिशन ह्युमॅनिटी' हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत तब्बल 15 हजार स्थलांतरित मजुरांची तपासणी करून त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले.

नागपूर:  कोरोनामुक्त झालेले लोक समाजातील इतर कोरोनाबाधितांसाठी फायदेशीर ठरू शकतात. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा वापरल्यास ते बाधित रुग्ण बरे होत आहेत. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या "ऍन्टीबाडी'ची चाचणी करून अशा लोकांची यादी करून घ्यावी. कोरोनाबाबत गैरसमज पसरवू नये, असे भावनिक आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक अढाव यांनी आज येथे केले.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली. यात आयएमएच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला आणि माजी अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे यांचा समावेश आहे. या पार्श्‍वभूमीवर आयएमएतर्फे पत्रकारांशी संवाद साधण्यात आले. इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे "कोव्हिड-19'च्या संसर्गाच्या काळात "मिशन ह्युमॅनिटी' हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत तब्बल 15 हजार स्थलांतरित मजुरांची तपासणी करून त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले.

वाचा- कोरोना प्रकोप : देवाला घडविणाऱ्यांनीही टेकले हात!

 नागपुरातील शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना एन-95 मास्क, सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला डॉ. कुश झुनझुनवाला, सचिव डॉ. मंजूषा गिरी, डॉ. मिलिंद नाईक, डॉ. वाय. एस. देशपांडे, डॉ. कृष्णा पराते, डॉ. वंदना काटे, डॉ. संजय देशपांडे, डॉ. प्रकाश देव, डॉ. आशिष दिसावल, डॉ. राफत खान, डॉ. अर्चना कोठारी, डॉ. आलोक उमरे, डॉ. अनिरुद्ध देवके, डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. संजय देवतळे , डॉ. राजेश सावरबांधे, डॉ. सचिन गाथे, डॉ. दिनेश अग्रवाल, डॉ. गौरी अरोरा उपस्थित होते.

खासगी रुग्णालयांच्या नूतनीकरणाचा प्रश्‍न
महापालिकेतर्फे दरवर्षी खासगी रुग्णालये, नर्सिंग होमच्या परवान्यांचे नूतनीकरण केले जाते. मात्र, कोरोनाच्या आणीबाणीच्या काळात महापालिकेचे प्रशासन कोरोनाविरुद्धच्या लढाईत लढत आहे. यामुळे रुग्णालयाचे नूतनीकरण थांबले आहे. एखाद्या डॉक्‍टरने माणुसकी जपत उपचार केल्यानंतर डॉक्‍टरांवर कायद्याचा बडगा उगारला जाऊ नये. यामुळे रुग्णालयांना पुढील सहा महिन्यांचा परवाना बिनदिक्कत देण्यासंदर्भातील भूमिका घ्यावी, असे डॉ. प्रकाश देवा म्हणाले. तसेच खासगी रुग्णालयात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर ते रुग्णालय "सील' केले जाते. यामुळे डॉक्‍टरची प्रतिमा मलिन होत असल्याचे सांगत, यामुळेच अनेक डॉक्‍टरांनी बाह्यरुग्ण विभागाला टाळे लावले असल्याचे डॉ. कुश झुनझुनवाला म्हणाले.

कोव्हिड-19 हा सांसर्गिक आजार आहे. त्याचे स्वरूप अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे आयसीएमआरतर्फे वारंवार मार्गदर्शक तत्त्वे बदलण्यात येत आहेत. अशा वेळी जुन्या मार्गदर्शक तत्त्वांचा संदर्भ देत डॉक्‍टरांना वेठीस धरण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. शासनाने नव्या मार्गदर्शक सूचनांनंतर जुन्या सूचना रद्द झाल्या, असा संदर्भ यात जोडावा.
-डॉ. वाय. एस. देशपांडे, माजी अध्यक्ष आयएमए, महाराष्ट्र

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Misson Humanity For Covid affected peoples by IMA