कोरोना प्रकोप : देवाला घडविणाऱ्यांनीही टेकले हात! 

श्रीकांत पेशट्टीवार 
सोमवार, 25 मे 2020

प्रारंभी चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. मात्र, मे महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडू लागले. सध्या जिल्ह्यात 21 कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. कोरोनाबाधीतांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने मागील आठवड्यातच गणेश मूर्तीकारांना यंदा मूर्ती तयार न करण्याच्या सूचना दिल्या. या सूचनेनेच मोठ्या मूर्तिकारांची चिंता वाढविली आहे.

चंद्रपूर :  काही महिन्यांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या मूर्तिकारांनी आधीच तयारी करून ठेवली होती. मात्र, कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने यंदा मोठ्या मूर्तिकारांना मूर्ती तयार न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासनाच्या या सूचनेने मोठ्या मूर्तिकारांची चिंता वाढविली आहे. कोरोनापुढे त्यांनीही हात टेकले आहेत. 

हे वाचा— गृह उद्योगांवरही संकट, कोरोनाने बिघडले महिला बचत गटाचे आर्थिक गणित
 

कारागिरांची वर्षभराची कमाई याच हंगामात 

जिल्ह्यात कुंभार समाजाची संख्या मोठी आहे. त्यांचा पारंपारिक व्यवसाय मातीकाम. त्यापासून विविध वस्तू तयार करून विकण्याचे काम कुंभार कारागिर करतात. गणेशोत्सव, दुर्गोत्सव हा या कारागिरांचा मोठा हंगाम असतो. वर्षभराची कमाई हे कारागिर याच हंगामात करतात. चंद्रपूर शहरात मंडळांच्या मूर्ती साकारणाऱ्या मोठ्या मूर्तिकारांची संख्या 70 ते 80 आहे, तर घरगुती गणेश मूर्ती तयार करणाऱ्यांची संख्या तीनशे ते चारशेच्या घरात आहेत. गणेशोत्सवाच्या काळात मोठे मूर्तीकार गोंदिया, बालाघाट येथून आपल्या मदतीसाठी कारागिर बोलवितात. त्याचा खर्च जवळपास 30 ते 40 हजार रुपये येतो. यंदा ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सव आहे. त्यामुळे मोठ्या, लहान मूर्तीकारांनी तयार करून ठेवली. वेळेवर भाव वाढतील, या उद्देशाने आधीच माती, विविध रंग, सजावटीचे साहित्य वेगवेगळ्या ठिकाणांहून बोलविले. जवळपास फेब्रुवारी महिन्यात मूर्तीकारांचे काम सुरू होते. याचदरम्यान, देशात कोरोना विषाणूने हातपाय पसरले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 22 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर झाले. त्यानंतर त्यात टप्प्याटप्प्यांनी वाढ होत गेली. 

मूर्ती तयार न करण्याच्या सूचना 

प्रारंभी चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. मात्र, मे महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडू लागले. सध्या जिल्ह्यात 21 कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. कोरोनाबाधीतांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने मागील आठवड्यातच गणेश मूर्तीकारांना यंदा मूर्ती तयार न करण्याच्या सूचना दिल्या. या सूचनेनेच मोठ्या मूर्तिकारांची चिंता वाढविली आहे. वर्षभर आतुरतेने प्रतीक्षा करीत असलेला हंगामच आता हातून जाणार असल्याच्या भीतीने आता करायचे तरी काय, असा प्रश्‍न या मूर्तिकारांसमोर पडला आहे. गेल्या काही वर्षांत मूर्तीसाठी लागणाऱ्या मातीचे भाव वाढले आहे. त्यामुळे मूर्तीकार आधीच माती बोलवितात. मागीलवर्षी अडीच हजार रुपये टाटासह भरून माती आणण्यात आली. यंदा त्यात एक हजार रुपयांची वाढ झाली. चंद्रपुरातून माती मिळणे बंद झाल्याने ती सिंदेवाही, राजुरा येथून बोलवावी लागते. मूर्तींना लागणारे रंग नागपूर, अमरावतीहून मूर्तीकार बोलवितात. सजावटीसाठी लागणारे स्टोन, दागिने, मणी अमरावती येथून बोलवितात. यंदा सर्व तयारी मूर्तिकारांनी करून ठेवली होती. मात्र, कोरोनामुळे त्यांच्या सर्व तयारीवर पाणी फेरल्या गेले आहेत. 

हे वाचा— ग्रीन म्हणता म्हणता रेडकडे वाटचाल! गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा 11 पॉझिटिव्ह 
 

दहा ते बारा लाखांचा हंगाम

 गणेशोत्सव, दुर्गात्सव हा मूर्तिकारांचा हंगाम असतो. या हंगामात छोटे मूर्तिकार जवळपास तीन ते पाच लाख रुपये, तर मोठे मूर्तिकार दहा ते बारा लाख रुपये कमवितात. मूर्ती विकून मिळणाऱ्या पैशातून वर्षभर त्यांचे घर चालते. मात्र, यंदा कोरोनामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. मोठे मूर्ती तयार करणारे अनेक मूर्तीकार आता घरगुती गणेश मूर्ती साकारण्याच्या कामाला लागल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. 

गणेशोत्सव, दुर्गोत्सवाची आम्हाला प्रतीक्षा असते. या काळात दिवसरात्र काम करून आम्ही मूर्ती घडवितो. त्यातून मिळणाऱ्या पैशातूनच आम्ही वर्षभराचे नियोजन करतो. यंदा कोरोनाने आम्हाला संकटात टाकले. आता करायचे तरी काय, असा प्रश्‍न आमच्यासमोर उभा आहे. 
-सुभाष ताटकंटीवार, मूर्तिकार चंद्रपूर. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona outbreak: Even those who created God put their hands up!