मद्यविक्रेत्यांसाठी डिसेंबर महिना असतो सर्वात खास, काय आहे कारण

नीलेश डोये
Monday, 18 January 2021

डिसेंबर महिन्यात थंडीचा जोर चांगलाच असतो. नाताळ आणि नववर्षांचा जल्लोष याच महिन्यात होतो. पार्ट्याही रंगतात. जल्लोष, पार्टी कोरडी होत नाही. मद्याशिवाय पार्टी, जल्लोष होत नाही.

नागपूर  : कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला. उद्योगधंद्यावरही परिणाम झाला. जगात मंदीचे सावट आले. परंतु मंदी, आर्थिक तंगी याचा कुठलाही परिणाम न पडणारा एकमेव व्यवसाय म्हणजे मद्यविक्री. वर्षभर गल्ला कमावणाऱ्या या व्यवसायासाठी डिसेंबर महिना खास असतो. या महिन्यात सर्वाधिक व्यवसाय होतो. इतर महिन्यांच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात लाखो लिटरची अतिरिक्त विक्री होते. शौकिनांनी या महिन्यात तब्बल ६३ कोटी ८० लाखांचे मद्य रिचवले.

डिसेंबर महिन्यात थंडीचा जोर चांगलाच असतो. नाताळ आणि नववर्षांचा जल्लोष याच महिन्यात होतो. पार्ट्याही रंगतात. जल्लोष, पार्टी कोरडी होत नाही. मद्याशिवाय पार्टी, जल्लोष होत नाही. नववर्षाच्या जल्लोषात नको म्हणणारेही सहभागी होऊन मद्यप्राशन करतात. त्यामुळे या महिन्यात सर्वाधिक विक्री होते. 

इतर महिन्यांच्या तुलनते ही विक्री लाखोच्या घरात आहे. यातून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळाला. कोरोनामुळे अनेकांचा व्यवसाय गेला आणि अनेकांच्या व्यवसायावर परिणाम झाला. त्यामुळे इतर व्यवसायावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. त्या तुलनेत मद्याच्या व्यवसायावर कमी परिणाम झाला. लॉकडाऊनमुळे दोन, अडीच महिने हा व्यवसाय ठप्प होता. त्यानंतर काही काळ व्यवसाय कमी होता. नंतरच्या काळात मात्र मद्य विक्री झाली. 

हेही वाचा - धक्कादायक! मतमोजणी सुरू असतानाच सख्ख्या चुलत भावाने केला चाकू हल्ला
 

सर्वाधिक महसूल देणाऱ्यांमध्ये मद्य विक्री आहे. त्यामुळे सरकारने सर्वप्रथम मद्य विक्रीला परवानगी दिली. नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत डिसेंबरमध्ये एक लाख लिटरपेक्षा अधिकची मद्यविक्री झाली. हिवाळी अधिवेशनादरम्यान मोठ्या प्रमाणात मद्यविक्री होते. यंदा हिवाळी अधिवेशन झाले नाही; अन्यथा विक्री अधिक वाढली असती, असे सांगितले जाते. 

डिसेंबर महिन्यातील मद्यविक्री

  • २८ लाख ९६ हजार ६७१ लिटर देशी
  • १४ लाख ६८ हजार ४५७ लिटर विदेशी
  • ६ लाख ३३ हजार ६८२ लिटर बिअर

नोव्हेंबर महिन्यातील मद्य विक्री

  • २७ लाख ३९ हजार २७१ लिटर देशी
  • १३ लाख २७ हजार २८४ लिटर विदेशी
  • ६ लाख १५ हजार ६०२ बिअर

३९१ कोटींचा महसूल

एप्रिल ते डिसेंबर महिन्यादरम्यान ३२८ कोटी ९७ लाख ९६ हजार ८९६ रुपयांच्या मद्याची विक्री झाली. मागील वर्षीच्या तुलनेत विक्रीत घट आहे. कोरोनामुळे यावर काही प्रमाणात परिणाम झाला. डिसेंबरमध्ये ६३ कोटी ८० लाख ७६ हजार ६८१ रुपयांची मद्यविक्री झाली.

एप्रिल ते डिसेंबरदरम्यान मद्यविक्री (लिटरमध्ये)

  • देशी १ कोटी ७९ लाख ४४ हजार ०२३
  • विदेशी ८४ लाख २७ हजार
  • बिअर ४१ लाख ७६ हजार ५९४ 

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: month of December had the highest alcohol sales