ऑगस्ट आणि संप्टेंबर ठरले मरणाचे महिने; नागपुरात तासाला दोघांवर होत होते अंत्यसंस्कार   

राजेश प्रायकर
Wednesday, 11 November 2020

मार्चपासून शहरात कोरोनाचे संक्रमण झाले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शहरातील सतरंजीपुरा भागात पहिल्या कोरोनाबळीची नोंद करण्यात आली. 

नागपूर ः मार्चपासून थैमान मांडलेल्या कोरोनामुळे ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये सर्वाधिक बळी गेले असून घाटांवर तासाला दोन पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरातील एकूण घाटांवर या दोन महिन्यांमध्ये दर दिवशी सरासरी ४३ पार्थिवावर दहनविधी करण्यात आला.

मार्चपासून शहरात कोरोनाचे संक्रमण झाले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शहरातील सतरंजीपुरा भागात पहिल्या कोरोनाबळीची नोंद करण्यात आली. एप्रिल, मे, जूनमध्ये कोरोनाबळींची संख्या अल्प होती. मात्र, जुलैमध्ये शंभरी पार केली. त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबर हे दोन महिने नागपूरकरांसाठी कोरोनाचे संकट गहिरे करणारेच ठरले. 

हेही वाचा - मोबाईलवर पत्ता शोधताना झाला मित्राचा अपघात आणि दोन तरुणांनी थेट बनवले 'परिभ्रमण'

या दोन महिन्यांत कोरोना संक्रमण वेगाने पसरले. एका दिवसाला दोन हजारावर बाधित सप्टेंबरमध्ये आढळून आले. त्याच वेगाने कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येतही वेगाने वाढ झाली. शहरात आतापर्यंत कोरोनामुळे २ हजार ४५८ जणांचा मृत्यू झाला तर ग्रामीण भागातील ५८३ तर जिल्ह्याबाहेरील ४३९ असे एकूण ३ हजार ४८० जणांचा मृत्यू झाला.

जिल्ह्याबाहेरील कोरोनाबळींचेही अंत्यसंस्कार शहरातील घाटांवर करण्यात आले. ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत घाटांवर २ हजार ६१८ कोरोनाबळींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ऑगस्टमध्ये १२३१ पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून यात ६५६ पुरुष तर ५७५ महिलांचा समावेश आहे. 

सप्टेंबरमध्ये १३८७ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाने आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना दिली. यात ९९० पुरुष, ३९७ महिलांचा समावेश आहे. या दोन महिन्यांत दररोज ४३ पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सरासरी तासाला दोघांवर दहनविधी करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

क्लिक करा - सरकार फक्त तीन टक्केच शेतकऱ्यांना देणार मदत!; कारण वाचून बसेल धक्का

पावणेतीन हजारांवर अंत्यसंस्कार

मार्च ते सप्टेंबरपर्यंत शहरातील घाटांवर एकूण २ हजार ७४० कोरोनाबळींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यातील मार्च ते जुलैपर्यंत केवळ १२२ कोरोनाबळींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये २ हजार ६१८ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more than 2700 covid deaths in august and september months in nagpur