हे काय नवीन... मोकळे भूखंड मनपा करणार जप्त 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जानेवारी 2020

गेल्या अनेक वर्षांपासून मोकळ्या भूखंडांवरील कचरा, वाढलेली झुडपं, घाण, पावसाळ्यात साचणारे पाणी परिसरातील नागरिकांना मनस्ताप ठरले आहे.

नागपूर : शहरात जमिनीच्या हव्यासापोटी अनेकांनी खरेदी केलेले भूखंड मोकळे आहेत. हे भूखंड उकीरडे ठरले असून, त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापालिकेने कायदेतज्ज्ञांच्या मदतीने यावर मार्ग शोधला असून आता हे भूखंड जप्त केले जाणार असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी स्पष्ट करतानाच मोकळ्या भूखंडधारकांना इशाराही दिला. 

गेल्या अनेक वर्षांपासून मोकळ्या भूखंडांवरील कचरा, वाढलेली झुडपं, घाण, पावसाळ्यात साचणारे पाणी परिसरातील नागरिकांना मनस्ताप ठरले आहे. याबाबत अनेकदा तक्रार करण्यात आली. परंतु महापालिकेला मोकळ्या भूखंडधारकांवर कारवाईचा कुठलाही अधिकार नसल्याने अधिकाऱ्यांनीही त्याकडे फारस्या गांभीर्याने बघितले नाही. याप्रकरणी अधिकारीही लाचार होते. महापालिका प्रशासनही याबाबत काही कायदेशीर कारवाई शक्‍य आहे काय? याबाबत तपासून पाहात होते. 
 

अधिक वाचा -  काम नाही, धाम नाही तरीही वाजवारेऽऽ

परंतु नोटीस पलिकडे कुठलेही अधिकार नसल्याने मोकळ्या भूखंडधारकांची मनमानी सुरू आहे. केवळ आर्थिक गुंतवणुकीच्या उद्देशाने खरेदी करण्यात आलेले हे मोकळे भूखंड नागरिकांच्या आरोग्यासाठी मात्र धोकादायक ठरले आहे. आता मात्र मोकळ्या भूखंडधारकांनाही कारवाईच्या कक्षेत आणण्यात येणार आहे. याबाबत कायदेतज्ज्ञांची महापालिकेने मदत घेतली. यातून मोकळ्या भूखंडधारकांवर कारवाई शक्‍य असल्याचे पुढे आले. 

या भूखंडधारकांनी यापुढे मोकळ्या भूखंडांवरील कचरा स्वतःहून साफ न केल्यास त्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केल्यास भूखंडावर महापालिकेतर्फे फलक लावून तो भूखंड जप्त करण्यात येणार आहे. या कारवाईबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पुढील आठवड्यात पाठविला जाणार असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी नमुद केले. 

हेही वाचा - तुम्ही बेरोजगार आहात? सावध राहा
 

सभागृहात येणार विविध अहवाल

 शहरातील खाजगी बस शहराबाहेर ठेवण्याबाबतचा अहवाल प्रवीण दटके यांच्या नेतृत्त्वातील समिती तयार करीत आहे. हा अहवाल येत्या 20 जानेवारीला सभागृहात अहवाल ठेवण्यात येणार आहे. यात समितीने केलेल्या शिफारसीनुसार कारवाई करण्यात येईल. खाजगी बसेस बाहेर ठेऊन त्या ठिकाणावरून प्रवाशांना शहरात आणण्यासाठी मनपा परिवहन बसची सेवा उपलब्ध केली जाईल, असेही महापौरांनी सांगितले. 

पेट्रोलपंपांवरील स्वच्छतागृहे नागरिकांसाठी खुली

 घरातून कामानिमित्त बाहेर निघाल्यानंतर लघुशंका आदीच्या शोधात फिरणाऱ्यांसाठी महापौर संदीप जोशी यांनी पेट्रोलपंपांवरील स्वच्छतागृहे खुली केली. उद्या, 1 जानेवारीपासून शहरातील 87 पेट्रोलपंपांवरील प्रसाधानगृहे महिला, पुरुषांसाठी खुली केली जातील. याबाबत संबंधित पेट्रोल पंपांवर महापालिका फलकही लावणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal corporation seized free land