Murder of a vegetable trader with borrowed money
Murder of a vegetable trader with borrowed money

हत्याकांडाचा खुलासा; कांदे-बटाटेची सहा लाखांची उधारी झाल्याने डोक्यात गोळी घालून खून

Published on

नागपूर : भाजीपाल्याचा व्यवसाय करताना कांदे-बटाटे उधार घेऊन सहा लाख रुपये परत करण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या कारणावरून दोघांनी भाजीविक्रेता उमेश ढोबळे (वय ३५, रा. सोमलवाडा) याच्या डोक्यात गोळी घालून खून केला. या हत्याकांडात दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आली. तसेच त्यांची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख शाकिर शेख हसन (३०, रा. आशीर्वादनगर) आणि सैयद इमरान सैयद जमील (२४, रा. टिमकी, तीन खंबा) अशी आरोपींची नावे आहेत. शाकीर शेख हा कांदे व बटाटे विक्रीचा ठोक व्यापारी आहे. उमेश याने दीड वर्षांपासून शाकीर याच्याकडून बटाटे व कांदे खरेदी केली. उमेश याच्याकडून शाकीर याला सहा लाख रुपये घ्यायचे होते. मात्र, तो पैसे देण्यास टाळाटाळ करायचा.

शाकीर याने मोबाइलवर संपर्क साधला असता प्रतिसाद देत नव्हता. तसेच अनेकदा पैसे देतो म्हणून त्याला बोलावून घेत होता आणि पैसे नसल्याचे कारण सांगत होता. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी शाकीर याने उमेश याला कायमचे संपविण्याचा कट आखला. बुधवारी दुपारी शाकीर याने उमेश याच्या मोबाइलवर संपर्क साधला. पैशाचा वाद मिटवायचा असल्याचे सांगून त्याला आशीर्वादनगरमधील बँक कॉलनी भागात बोलाविले. या परिसरात शाकीर याचा भाऊ राहतो.

दुपारी चार वाजताच्या सुमारास उमेश हा मोपेडने बँक कॉलनीत आला. शाकीर हा त्याच्या मोपेडवर बसला. त्याच्या मागे इमरान हा मोपेडने येत होता. बँक कॉलनी परिसरात शाकीर याने उमेश याला पैशाची मागणी केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. शाकीर याने पाठीमागे लपविलेली पिस्तूल काढली. उमेश याच्या डोक्यात गोळी झाडली. उमेश खाली पडला. शाकीर हा इमरानसह पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे, सक्करदरा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने आणि पोलिस हवालदार राजेश पालथे,राजेंद्र यादव, दीपक तऱ्हेकर, मिथुन नाईक आदींसह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमी उमेश याला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान उमेश याचा मृत्यू झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा करून शाकीर व इमरानला अटक केली.

घराजवळ करणार होता ‘गेम’

उमेशच्या बनवाबनवीच्या कार्यक्रमाला शाकीर कंटाळला होता. त्यामुळे एकदाचा त्याचा काटा काढायचा, असे त्याला वाटत होते. शाकीर हा उमेश याला सोमलवाडा भागातच ठार मारहाण होता. परंतु, घराजवळ उमेश याची हत्या केल्याने पकडले जाऊ अशी भीती शाकीर याला होती. त्यामुळे त्याने घराच्या काही किमी अंतरावर ठार मारण्याचा कट रचला.

शहरात पिस्तुलांची भरमार

शहरातील प्रत्येक गुन्हेगाराच्या टोळीकडे पिस्तूल आहेत. पिस्तूल वापरणे हा गुंडाचा स्टेट्स सिम्बॉल झाला आहे. त्यामुळे जवळपास २० हजार ते ९० हजार रुपयांपर्यंत किंमत असलेल्या पिस्तूल गुंड वापरत आहेत. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या राज्यातून महाराष्ट्रात पिस्तुलांची खेप येत असते. अनेकदा पिस्तूल जप्त केल्यावर ती कुठून आणली? याचे उत्तर शोधण्याच्या भानगडीत पोलिस दिसत नाहीत.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com