file photo
file photo

नागपुरात गॅंगवॉर पेटले; तिघांनी युवकाचे अपहरण करून केले असे...

नागपूर : तीन गुन्हेगारांनी दुचाकीने युवकाचे अपहरण केले. डुंडा मारोती परिसरात नेऊन त्याचा दगडाने ठेचून खून केला. ही थरारक घटना आज रविवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. सनी दामोदर जांगीड (वय 20, रा. नाईकनगर, अजनी) असे मृताचे नाव आहे. या हत्याकांडामुळे शहरात पुन्हा गॅंगवॉर पेटण्याची शक्‍यता आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनू रायडर ऊर्फ प्रशील जाधव (वय 22) हा कुख्यात गुंड असून, त्याच्यावर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचा सनी जांगीड याच्याशी वस्तीतील दबदबा ठेवण्यावरून वाद होता. मात्र, सनी रायडरचे ऐकत नव्हता. त्यामुळे मोनू रायडर सनीचा गेम करण्याच्या तयारीत होता. शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास मोनू रायडरने सनीला फोन केला. त्यावेळी तो एका अंत्ययात्रेत मानेवाडा घाटावर होता. त्याला एका लॉनजवळ बोलावले. सनी भेटायला तेथे असता तेथे मोनू रायडर आणि त्याच्या टोळीतील गुंड ललित रेवतकर आणि बंटी उपस्थित होते.

मोनूने सनीला शिवीगाळ करीत मारहाण केली. त्याच्या पोटाला चाकू लावून दुचाकीवर बसण्यास सांगितले. ललित दुचाकी चालवीत होता. तर एकाच दुचाकीवरून तिघांनीही सनीचे अपहरण केले. त्याला वेळाहरी, डुंडा मारोती परिसरात नेले. डुंडा मारुती परिसरात मारहाण करून सनीचा खून केला. पोलिसांनी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला. 

टोळीत सहभागाचा वाद 
मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी सनी व प्रशील सोबत वाहनचोरी करायचे. नंतर प्रशील साथीदारांसह कुख्यात रोहित रामटेके याच्या टोळीत सहभागी झाला. तर सनी लकी तेलंगच्या टोळीत सहभागी झाला. महिनाभरापूर्वी रोहित व त्याच्या साथीदारांविरुद्ध अजनी पोलिस ठाण्यात गॅंगरेपचा गुन्हा दाखल झाला. सनीच्या नातेवाइकाने गुन्हा दाखल करण्यासाठी पीडित मुलीला मदत केल्याची चर्चा होती. याशिवाय एका वाहनचोरी प्रकरणात सनीने प्रशील व त्याच्या साथीदारांची नावे पोलिसांना सांगितल्याने दोघांमध्ये वाद होता. 

एका आरोपीचे आत्मसमर्पण 
सनी हत्याकांडात एका मारेकऱ्याने हुडकेश्‍वर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. अन्य दोघे सोमवारी आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती आहे. या हत्याकांडाचा छडा गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारचे पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम, दिलीप चंदन, किरण चौगुले यांच्या पथकाने लावला. 

पोलिसांचा हलगर्जीपणा 
अपहरणकर्त्या तिन्ही युवकांसह सनी गुन्हेगारी जगतात सक्रिय आहे. शनिवारी दुपारी सनीचे अपहरण झाल्यानंतर हत्याकांड घडणार याची कल्पना पोलिसांनाही होती. तरी सीसीटीव्ही फुटेज किंवा मोबाईल लोकेशनवरून आरोपींचा शोध पोलिसांनी घेतला नाही. त्यामुळे सनी जांगीडचा बळी जाण्यास पोलिसांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याची चर्चा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com