मानकापुरात पहाटे घडला थरार; दगडाने ठेचून युवकाचा खून, आरोपीला अटक

अनिल कांबळे
Sunday, 18 October 2020

आजूबाजूला चौकशी केली असता त्याचे नाव बनारसी असल्याचे समजले. त्यामुळे सुरुवातीला मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद कली होती. तपासात लक्षात आले की, एका आरोपीने बनारसीचा दारू पिण्याच्या कारणावरून दगडाने ठेचून खून केला.

नागपूर : मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बनारसी नावाच्या युवकाचा एका आरोपीने दगडाने ठेचून खून केला. ही घटना आज पहाटे उघडकीस आली. या हत्याकांडात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानकापूर पोलिस ठाण्याअंतर्गत जखमी अवस्थेत आढळलेल्या इसमाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृताचे नाव बनारसी आहे. त्याचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष आहे. शुक्रवारी मध्यरात्री मानकापूर पोलिसांना माहिती मिळाली की एक युवक गोधणी रोडवर श्रीकृष्ण ऑटो गॅरेजच्या बाजूला जखमी अवस्थेत पडून आहे. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून जखमीला उपचारार्थ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

जाणून घ्या - रेल्वे चुकली अन् तरुणाला सापडला उद्योगाचा मार्ग; आता करतोय हजारोंची उलाढाल

आजूबाजूला चौकशी केली असता त्याचे नाव बनारसी असल्याचे समजले. त्यामुळे सुरुवातीला मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद कली होती. तपासात लक्षात आले की, एका आरोपीने बनारसीचा दारू पिण्याच्या कारणावरून दगडाने ठेचून खून केला. त्या आरोपीला मानकापूर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

कुख्यात सुमीत ठाकूरला अटक

सुमीत ठाकूर याची शहरात टोळी आहे. २०१५ मध्ये त्याने घराच्या जवळ राहणाऱ्या प्रा. म्हस्के यांना मारहाण करून कार जाळली होती. त्या प्रकरणात पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून सुमीत ठाकूर व साथीदारांविरुद्ध मोक्काची कारवाई केली होती. त्या प्रकरणात सुमीतला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. या जामीन काळात त्याला नागपूर शहराच्या बाहेर राहायचे होते.

सविस्तर वाचा - लग्नास नकार दिल्याने घरमालकाकडून भाडेकरू शिक्षिकेला मारहाण, गुन्हा दाखल

पण, त्यानंतरही तो शहरात दाखल झाला. न्यायालयाच्या अटीचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी त्याला पकडले होते. त्यानंतर त्याचा जामीन रद्द करण्याची विनंती उच्च न्यायालयात केली. न्यायालयाने त्याचा जामीन रद्द केला. मार्च २०१९ पासून फरार होता. दरम्यान, शुक्रवारी तो नागपूर शहरात दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो एमएच-४०, एन-९०५५ क्रमांकाच्या कारने वर्धेच्या दिशेने पळून जात होता. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून गुरमीत ढाब्याजवळ त्याला पकडले.

फुटाळा तलावात पडली कार

४० वर्षीय महिला शुक्रवारी मध्यरात्री पांढऱ्या रंगाच्या कारने फुटाळ्याकडून जात होती. कार वेगात होती. फुटाळा तलावाजवळील पुलावर महिलेचे कारवरील नियंत्रण सुटले. कठडे तोडून कार तलावात कोसळली. जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली. दोन युवकांना कारमध्ये महिला दिसली. युवकांनी लगेच तलावात उडी घेतली. महिलेला सुखरूप तलावातून बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी महिलेच्या नातेवाइकांना माहिती दिली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a youth crushed by a stone