लग्नास नकार दिल्याने घरमालकाकडून भाडेकरू शिक्षिकेला मारहाण, गुन्हा दाखल

विजयकुमार राऊत
Wednesday, 14 October 2020

माझ्याशी लग्न कर, असा तगादा त्याने पीडितेकडे लावला होता. मात्र, तिने त्याला प्रतिसाद दिला नाही. यावरुन संतापलेल्या लेखरामने सोमवारी सकाळच्या सुमारास घरासमोरील रस्त्यावर तिला लाथा, बुक्या व काठीने बेदम मारहाण केली.

भिवापूर (जि. नागपूर): लग्न करण्याचा तगादा लावत एका घरमालकाने भाडेकरू शिक्षिकेला बेदम मारहाण केल्याची घटना भिवापुरातील शिवाजी लेआऊटजवळील वस्तीत घडली. यामध्ये घरमालकाच्या पत्नीने सुद्धा त्याला साथ दिली. त्यामुळे पोलिसांनी दोघांविरोधात वियनभंग आणि मारहाणीचा गुन्हा नोंदविला आहे.

लेखराम ऊरकुडकर, असे आरोपी घरमालकाचे नाव आहे. पीडित भाडेकरू महिला (३४)शिक्षिका असून अविवाहीत आहे. गेल्या जानेवारी २०१९ पासून ती आरोपीच्या घरी भाड्याने राहते. त्याने वारंवार तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्याने लॉकडाऊनच्या काळात अनेकदा तिची छेड काढत तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. याविषयी तिने आरोपीच्या पत्नीला सांगून समज देण्यास सांगितले. तसेच दुसरे भाड्याचे घर शोधण्याचाही प्रयत्न केला. मात्र, घर सोडून गेल्यास तुझी गावात बदनामी करेन आणि तुला दुसरीकडेही भाड्याने राहू देणार नाही, अशा धमकी दिली. या सर्व प्रकाराला कंटाळून तिने २५ मे रोजी पोलिसांत धाव घेतली. घरमालकाविरोधात तक्रार दिली.  २५ मे ते १० जून २०२० या काळात लेखरामविरुद्ध तिने तीनदा तक्रार नोंदविली. परंतु, प्रत्येक वेळी एनसी गुन्ह्याची नोंद करीत समज देवून त्याला सोडून देण्यात आले. 

हेही वाचा - बिअरच्या बाटलीवरील 'क्राऊन कॉर्क' अन् 'ओपनर'चा शोध लावणारी...

माझ्याशी लग्न कर, असा तगादा त्याने पीडितेकडे लावला होता. मात्र, तिने त्याला प्रतिसाद दिला नाही. यावरुन संतापलेल्या लेखरामने सोमवारी सकाळच्या सुमारास घरासमोरील रस्त्यावर तिला लाता, बुक्या व काठीने बेदम मारहाण केली. अंगणात ठेवलेल्या तिच्या दुचाकीचेही नुकसान केले. विशेष म्हणजे मारहाण करताना त्याच्या पत्निनेसुद्धा त्याची साथ दिली. हा सगळा प्रकार अनेकांनी बघितला. एका प्रत्यक्षदर्शीने या घटनेचे मोबाईलद्वारे चित्रन सुद्धा केले. शेजारच्या एका व्यक्तीने तिची सुटका केली. त्यानंतर पीडित शिक्षिकेच्या तक्रारीवरून आरोपी लेखराम आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा नोंदविला असून ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात चंद्रशेखर रेवतकर पुढील तपास करीत आहेत. 

हेही वाचा - संस्कार भारतीचे माजी महामंत्री आणि व्हीएनआयटीच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष विश्राम...

दरम्यान, भाडेकरू शिक्षिकेला मारहाण करण्यात आरोपी लेखरामला मदत करणाऱ्या त्याच्या पत्नीने शिक्षिकेविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदविली असल्याची माहिती आहे. शिविगाळ व मारहाण केल्याचा आरोप तिने या तक्रारीमध्ये केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl beaten by owner in bhiwapur of nagpur