‘कॉम्प्रमाईज’साठी गेला अन् जीव गमावून बसला; नागपुरातील गोवा कॉलनीत थरार

योगेश बरवड
Saturday, 5 December 2020

काहीही कळण्यापूर्वी आरोपींनी चाकू व लोखंडी रॉडसह गुलशनवर हल्ला चढविला. भीतीपोटी अन्य मित्र पळून गेले. सोहोलने मानेत चाकू खुपसून त्याला जमिनीवर लोळविले. त्यानंतर करण मडावीने रॉडने चेहऱ्यावर फटके हाणणे सुरू केले. हालचाल थांबल्यानंतर आरोपी पळून गेले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नागपूर : दोन गटातील धुसफूस कायमची शमविण्याच्या इराद्याने एक गट कॉम्प्रमाईजसाठी दुसऱ्या गटाच्या इलाख्यात गेला. पण, गैरसमज झाल्याने दुसऱ्या गटातील मंडळींनी चाकू व लोखंडी रॉडने वार करीत प्रतिस्पर्ध्याची हत्या केली. ही थरारक घटना गुरुवारी रात्री सदर हद्दीतील गोवा कॉलनीत घडली.

प्राप्त माहितीनुसार, गुलशन गोपाल कनौजिया (२५, रा. आझाद चौक, धोबीपुरा) असे मृताचे तर करण मडावी (२३, रा. मोहननगर), सोहेल अली (२२, रा. नवीवस्ती, मंगळवारी), अंशूल जगतनारायण सिंग (२३, रा. जगदीशनगर, हजारी पहाड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मृत व आरोपींचे जुने वैमनस्य होते. त्यांच्यात अधून मधून खटके उडायचे. अलीकडेच त्यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला होता. वाद कायमचा संपुष्टात यावा अशी गुलशनची भावना होती.

जाणून घ्या - Video : तारणहार म्हणवणाऱ्या जगदीश खरेंची ‘लिम्का बुक’मध्ये नोंद; अभिनेता अक्षयकुमारने दिले होते पाच लाख

कॉम्प्रमाईज करण्यासाठीच त्याने आसिफ कुरेशी व त्याचा भाऊ बंटी कुरेशी व अन्य मित्रांना सोबत घेतले. आरोपी गोवा कॉलनी परिसरात असल्याची माहिती मिळाली. तिथे जाऊन चर्चेतून वादावर पडदा टाकावा यासाठी रात्री १०.१५ च्या सुमारास सर्वजन तिथे पोहोचले. पण, प्रतिस्पर्धी गुलशनला साथीदारांच्या लवाजम्यासह बघून आरोपींना वेगळाच संशय आला.

काहीही कळण्यापूर्वी आरोपींनी चाकू व लोखंडी रॉडसह गुलशनवर हल्ला चढविला. भीतीपोटी अन्य मित्र पळून गेले. सोहोलने मानेत चाकू खुपसून त्याला जमिनीवर लोळविले. त्यानंतर करण मडावीने रॉडने चेहऱ्यावर फटके हाणणे सुरू केले. हालचाल थांबल्यानंतर आरोपी पळून गेले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अधिक वाचा - अमरावती शिक्षक मतदारसंघ निकाल; भल्याभल्यांना मागे टाकत अपक्ष उमेदवार किरण सरनाईकांचा विजय

२४ तासांत तीन आरोपींना अटक

घटनेनंतर गँगवार भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खुनाच्या घटनेची माहिती मिळताच सदर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गुलशनचा लहान भाऊ रोहित याच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरू केला. लागलीच खबऱ्यांना सक्रिय करण्यात आले. आरोपींची गोपनीय माहिती काढून पोलिसांनी घटनेच्या २४ तासांच्या आत तीन आरोपींना शिताफीने अटक केली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a youth due to misunderstanding in Nagpur