"गेम' होण्यापूर्वीच काढला काटा; अडीच महिन्यानंतर "मर्डरमिस्ट्री'चा उलगडा

murder.
murder.

नागपूर : कुख्यात गुंडाकडून ठार मारण्याची धमकी मिळाल्याने भेदरलेल्या युवकाने मित्रांच्या मदतीने गुंडाचाच "गेम' केला. घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून मारेकऱ्यांनी मृतदेह जंगलात नेऊन जाळला. तब्बल अडीच महिन्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या कौशल्याने या थरारक मर्डरमिस्ट्रीचा उलगडा केला. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांनी पत्रकार परिषद घेऊन या हत्याकांडाची माहिती दिली.

मोनेश भागवत ठाकरे (वय 25, शिवनगर, राममंदिर चौक) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर अक्षय गजानन येवले (वय 25, रा. भवानीनगर, पारडी), निलेश दयानंद आगरे (वय 19, भवानीनगर) आणि अमोल उर्फ विक्‍की श्रीचंद हिरापुरे (वय 25, पारडी, भवानीनगर) अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपी सोहम बिरसिंह बिलोरिया (वय 30, रा. गंगाबाग, पारडी) हा फरार झाला आहे.

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मोनेशचे फर्निचरचा व्यवसाय होता. टोळी तयार करुन कळमना-पारडी परिसरात दबदबा निर्माण केला होता. वर्चस्व दर्शवण्यासाठी दहशत निर्माण करायचा. मोनेशला स्वप्निल वाघ, आशुतोष पांडे आणि आशिष टाले यांचीही साथ होती. मोनेशच्या वस्तीत आरोपी अक्षय येवले याचे वर्चस्व होते. त्याच्यावर दोन खून आणि दोन खुनाचे प्रयत्नाचे गुन्हे यापुर्वीच दाखल आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून तो "हाफ मर्डर' च्या गुन्ह्यात कारागृहात होता. दरम्यान, विनोद वाघ याने अक्षयचा राईट हॅंड निलेश आगरे याची धुलाई केली होती. या घटनेचा वचपा काढण्यासाठी अक्षय विनोदच्या मागावर होता. विनोद ऐवजी टोळीचा म्होरक्‍या मोनेश तावडीत सापडला. वस्तीतच चाकुने सपासप वार करुन मोनेशला रक्ताच्या थारोळ्यात लोळवले. घटनेनंतर मोटरसायकलवरुन मृतदेह पारडी जवळील जंगलात नेऊन जाळून टाकला.

असे घडले हत्याकांड
27 नोव्हेंबर 2019 ला रात्री आठ वाजता पारडीतील काजल बारमध्ये आरोपी अक्षय येवले, निलेश आगरे हे दारू ठोसत बसले होते. दरम्यान बारमध्ये मोनेश ठाकरे, आशूतोष आणि आशिष हे तिघे आले. मोनेश हा अक्षय येवलेल्या टेबलवर बसून दारू पित होता. दरम्यान आशूतोष आणि आशिष निघून गेले. मोनेश एकटाच सापडल्याची संधी मिळाली. अक्षय आणि निलेशने त्याला दुचाकीवर ट्रीपल सिट स्वतःच्या घराजवळ नेले. तेथे त्याचा गळा चिरून खून केला. त्याचा मृदहेद दुचाकीने 22 एकरी जंगलात नेले. तेथे दुचाकीतून पेट्रोल काढून मृतदेह पेटवून दिला.

अशी लावली विल्हेवाट
अक्षय, निलेश आणि अमोल यांनी मोनेशचा मृतदेह जंगलात जाळला. परंतु पेट्रोल कमी असल्यामुळे मृतदेह अर्धवट जळाला होता. त्यामुळे त्यांनी आरोपी सोहम बिलोरिया याला कार घेऊन बोलावले. दुसऱ्या दिवशी मोनेशचा अर्धवट जळालेला मृतदेह साडीत बांधला. तो सांगडा जामठ्याजवळील नाल्यात फेकून दिला.

पोलिसांची दिशाभूल
27 नोव्हेंबरला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार मोनेशचे वडील भागवत यांनी पारडी पोलिसात केली. मात्र ,पारडी पोलिसांनी तक्रारीला गांभीर्याने घेतले नाही. गुन्हे शाखेने प्रकरणाचा तपास करताना "लास्ट सिन थेअरी'नुसार चौकशी केली. मात्र, मुख्य आरोपी अक्षय येवले आणि निलेश यांनी वारंवार पोलिसांची दिशाभूल केली. त्यामुळे गुन्हेशाखेलासुद्धा हत्याकांड उघडकीस आणण्यास अडीच महिन्यांचा कालावधी लागला.

डाव पडला उलटा
मोनेश ठाकरे याने अक्षयचा खात्मा करण्याचा कट रचला होता. त्याने अक्षयला सोन्याचे सिक्‍के असल्याची बतावणी करीत एका ठिकाणी सोबत येण्यासाठी दबाव टाकला होता. अक्षयला धोक्‍याचा लगेच अंदाज आला. आता मोनेश आपला गेम करणार, अशी भीती त्याला होती. त्यामुळे त्याने मोनेशला जास्त दारू पाजली आणि मित्रासोबत नेऊन "गेम' केला.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com