नागपूर जिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाला सुरुवात 

नीलेश डोये 
Tuesday, 22 September 2020

कोरोनापासून बचाव करण्यासाठी शासनाने आखून दिलेल्या त्रिसूत्रीची काळजीपूर्वक अंमलबजावणी करणे, जास्तीत जास्त सर्वेक्षणातून वेळीच रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करणे, जेणेकरून मृत्युदर टाळता येऊ शकतो.

नागपूर : प्रशासन आणि जनता यांच्या समन्वयातून जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळविता येऊ शकणार आहे. शासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान याच उद्देशाने राबविले आहे. त्यामुळे जनतेने या अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन जि. प.च्या अध्यक्षा रश्मी बर्वे व सीईओ योगेश कुंभेजकर यांनी पत्रकार परिषदेत केले. 

१५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानातून व्यापक सर्वेक्षण होणार आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी शासनाने आखून दिलेल्या त्रिसूत्रीची काळजीपूर्वक अंमलबजावणी करणे, जास्तीत जास्त सर्वेक्षणातून वेळीच रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करणे, जेणेकरून मृत्युदर टाळता येऊ शकतो. त्याचबरोबर कोरोनामुक्त झालेल्यांना घ्यावयाची काळजी याचीही जनजागृती याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 

सर्व्हेकरिता १९७४ टीम तयार करण्यात आल्या असून यात आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्याबरोबर दोन स्वयंसेवक राहणार आहेत. प्रत्येक टीमला ५० घरांची जबाबदारी देण्यात येणार आहे. दीड महिना हे सर्वेक्षण चालणार असून, कोरोनासदृश लक्षणे दिसल्यास त्यांची टेस्ट करून घ्यायच्या आहेत. या वेळी जि. प. सभापती भारती पाटील, उज्ज्वला बोढारे, तापेश्वर वैद्य उपस्थित होते. 

हेही वाचा : ऑक्सिजनच्या वापरावर लावले निर्बंध, गंभीर रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ

अधिकारी बैठकीत व्यस्त 
जिल्ह्यात कोरोनाचा संपूर्ण भार मेडिकल, मेयो, एम्स याच शासकीय रुग्णालयावर आहे. आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर दौरे, बैठकीत व्यस्त असून व्यवस्था कनिष्ठांच्या खांद्यावर टाकून मोकळे झालेत. जिल्ह्यात ८ खासगी रुग्णालय रुग्णांवर उपचारासाठी अधिग्रहित करून जि. प.चा आरोग्य विभाग मोकळा झाला आहे. दर परवडत नसल्याने रुग्ण खासगी दवाखान्यात जात नसल्याची माहिती आहे. याकडे आरोग्य विभागाचे कोणतेही लक्ष नाही. खासगीत उपचार घेण्याऱ्यांची कुठलीही माहिती आरोग्य विभागाकडे नाही. याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

संपादन : मेघराज मेश्राम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My family, my responsibility campaign