Video : बाजारात अद्रक-लसूण विकून वडिलांनी बनवले चॅम्पियन...मुलीने मिळवले हे यश

shubhangi raut
shubhangi raut

नागपूर : नागपूरची ज्यूदोपटू शुभांगी राऊतचे वडील घरापुढे असलेल्या बुधवार बाजारात छोटेसे दुकान लावून लिंबू, अद्रक, लसणाची विक्री करतात. मात्र, वडिलांच्या या कामाचा शुभांगीने कधी बाऊ केला नाही किंवा न्यूनगंड बाळगला नाही. उलट वडिलांचे नाव उज्ज्वल करण्याचा ध्यास शुभांगीने घेतला आहे. भुवनेश्‍वर येथे नुकत्याच पहिल्या विद्यापीठ खेलो इंडिया स्पर्धेत तिने रौप्यपदक जिंकून आई-वडिलांचेच नव्हे तर शहराचेही नाव उंचावले. ती झेप घेण्यासाठी सज्ज असली तरी तिच्या पंखांना आणखी बळ हवे आहे. 

सोमवारी क्वार्टर येथे राहणाऱ्या 20 वर्षीय शुभांगीने भुवनेश्‍वर येथे ज्यूदोतील 57 किलो वजनगटात रौप्यपदकाला गवसणी घातली. कानपूर येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याने तिची निवड झाली होती. एस.बी. सिटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेली शुभांगी म्हणाली, भुवनेश्‍वर येथील स्पर्धा खूप आव्हानात्मक होती. कारण कानपूर येथील प्रथम आठ जणींतच स्पर्धा होती. कानपूरला ज्या चौघींनी पदक जिंकले. त्यांनाच येथेही पदक जिंकता आले. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी गुवाहाटी येथे झालेल्या युवा खेलो इंडिया स्पर्धेतही पदक जिंकले होते. त्यामुळे विशेष आनंद झाला. 

खेलो इंडियात जिंकले रौप्यपदक
ती म्हणाली, तिसरीत असताना वडील सुभाष यांच्या प्रोत्साहानामुळे मी ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या सभागृहात गणेश निंबर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यूदो खेळायला सुरुवात केली. मोठी बहीण प्रणाली हीसुद्धा खेळत असल्याने लवकरच आवड निर्माण झाली. फक्त खंत अशी वाटते की सर्वसामान्य लोक ज्यूडोचा संबंध कराटेशी जोडतात. कारण दोन्ही खेळ वेगळे आहे, असेही ती म्हणाली. 

आता मुकुंद डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणाऱ्या शुभांगीने 2014 मध्ये मुंबई येथे झालेल्या राज्य शालेय स्पर्धेत प्रथम सुवर्णपदक जिंकले आणि त्याचवर्षी दिल्ली येथे राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. 2016 मध्ये कोची येथे झालेल्या आशियाई ज्युनिअर ज्यूदो स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले. 

ती म्हणते, ज्यूदो खेळात शारीरिक कणखरतेसोबत मानसिक कणखरताही आवश्‍यक आहे. मानसिकतेसाठी मी "सेल्फ टॉक'वर भर देते. शारीरिक कणखरता ठेवण्यासाठी दर्जेदार आहाराची आवश्‍यकता आहे आणि त्यासाठी पैशाची गरज भासते. वडिलांचे छोटेसे दुकान असले तरी आम्ही बहिणींनी कधीही याचा बाऊ केला नाही किंवा आम्हाला त्याबद्दल कधीही वाईट वाटले नाही. अडचण असली तरी वडिलांनी नेहमीच आम्हाला प्रोत्साहनच दिले. त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकले. मात्र, यापुढे झेप घ्यायची असेल तर आणखी मदतीची गरज आहे. 

बहिणीच्या लग्नाच्या दिवशी घरी पोचले 
गेल्यावर्षी विशाखापट्टणम येथे मी सिनिअर राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले होते. इकडे घरी मोठी बहीण प्रणालीच्या लग्नाची धावपळ सुरू होती. हळद किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात मी सहभागी होऊ शकत नसल्याचे दुःख होते. तरीही मी स्पर्धेत सहावा क्रमांक मिळविला. वडिलांना मात्र मी लग्नाच्या दिवशी घरी यावे असे वाटत होते. त्यामुळे त्यांनी परिस्थिती नसतानाही विमानाच्या तिकिटाची व्यवस्था करून दिली आणि नेमके लग्नाच्या वेळी मी नागपुरात हजर झाली. हा आतापर्यंतच्या माझ्या जीवनातील कायम स्मरणात राहणारा क्षण आहे, असे शुभांगीने सांगितले. 

आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. तरीही आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे मी इथपर्यंत झेप घेतली. मात्र, आशियाई क्रीडा, राष्ट्रकुल, विश्‍व किंवा ऑलिपिंक स्पर्धेपर्यंत झेप घ्यायची असेल तर आर्थिक पाठबळाची किंवा नोकरीची नितांत गरज आहे. त्यामुळे नागपूरचे असलेले क्रीडामंत्री यांनी माझी निकड लक्षात घ्यावी. 
- शुभांगी राऊत. 
खेलो इंडियातील रौप्यपदक विजेती (ज्यूदो) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com