
भाजपचे सदस्य सुभाष गुजरकर यांनी सदस्यांच्या मानधनाचा मुद्दा काढला. 'आम्ही मानधन मिळविण्यासाठी नाही तर लोकांच्या सेवेसाठी निवडून आलो आहोत', असे म्हणत उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी त्याला विरोध दर्शविला.
नागपूर : जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपासोबत विरोधाचेही राजकारण सुरू आहे. भाजपच्या मागणीला थेट विरोध करण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांच्या मानधनवाढीचा मुद्दा भाजपच्या एका सदस्याने मांडला. काँग्रेसने याला विरोध दर्शविला. राष्ट्रवादीकडून मात्र कोणतीही भूमिका घेण्यात आली नाही.
भाजपचे सदस्य सुभाष गुजरकर यांनी सदस्यांच्या मानधनाचा मुद्दा काढला. 'आम्ही मानधन मिळविण्यासाठी नाही तर लोकांच्या सेवेसाठी निवडून आलो आहोत', असे म्हणत उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी त्याला विरोध दर्शविला. दुधाराम सव्वालाखे, नाना कंभालेंसह इतर सदस्यांनी त्याला विरोध केला.
हेही वाचा - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन
भटक्या-विमुक्तांना घरकुल द्या : सव्वालाखे
भटक्या-विमुक्तांच्या घरकुलाचा मुद्दा दुधाराम सव्वालाखे यांनी उपस्थित केला. घरकुलासाठी ५०० वर अर्ज आले असून अद्याप एकाही व्यक्तीला लाभ मिळाला नाही. भटक्या-विमुक्तांना घरकुलाचा लाभ तत्काळ देण्याची मागणी त्यांनी केली. त्याचप्रमाणे पाणंद रस्त्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेला निधी वळता करण्याची मागणीही केली. खंडाळा येथे लावण्यात आलेल्या खराब जलशुद्धीकरण यंत्राच्या चौकशीची मागणी त्यांनी केली.
गाव तिथे गोडावून योजनेची अंमलबजावणी करा : देशमुख
गाव तिथे गोडावून योजनेबाबत जिल्हा परिषदेच्या मागील दोन्ही सर्वसाधारण सभांमध्ये प्रस्ताव मांडण्यात आला. परंतु, यावर काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर उपयोजना करण्यात यावी, अशी मागणी सलील देशमुख यांनी केली.
हेही वाचा - '...तर काँग्रेस अन् राष्ट्रवादीमधील अर्धे नेते तुरुंगात जातील'
भूमिगत केबल लाइन टाका : बालपांडे
लाभार्थ्यांना पट्टे वाटप करा. वाढीव वीजबिल कमी करण्यासोबत भूमिगत केबल लाइन टाकण्याची मागणी वंदना बालपांडे यांनी केली. सभेतील चर्चेत प्रकाश खापरे, दिशा मुलताई, मानकर, व्यंकट कोरेमारे, सूचिता ठाकरे, राधा अग्रवाल, कैलास बरबटे आदींनी भाग घेतला.