नागपूर शहराचा चाळीस टक्के पाणीपुरवठा सोमवारी बंद

राजेश प्रायकर
Friday, 30 October 2020

मंगळवारी सकाळीही पाणीपुरवठा बंद राहील. नागरिकांनी रविवारी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा.

नागपूर : कन्हान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर गळती दुरुस्ती तसेच इतर देखभालीची कामे येत्या सोमवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे उत्तर नागपुरातील आशीनगर, पूर्व नागपुरातील सतरंजीपुरा, लकडगंज झोन तर दक्षिण नागपुरातील नेहरूनगर झोनमधील शेकडो वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

‘गुच्छी‘चे दर किलोला तीस हजार तरीही संपते हातोहात, जाणून घ्या कारणे...

कन्हान येथील जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिन्यांवरील गळतीची दुरुस्ती तसेच इतर देखभालीची कामे २ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजतापासून सुरू करण्यात येणार आहे. ही कामे दुसऱ्या दिवशी ३ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू राहतील. महापालिका व ओसीडब्लूने या कामांसाठी २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरूनगर, आशीनगर झोनमधील २८ जलकुंभांना पाणीपुरवठा होणार नाही.

चर्चा तर होणारच! रंगीत कापुस ठरणार गेम चेंजर...

आशीनगर झोनमधील बेझनबाग जलकुंभ, बिनाकी, बिनाकी जलकुंभ क्रमांक १ व २, इंदोरा येथील जलकुंभ क्रमांक १ व २, गमदूर डायरेक्ट टॅपिंग, आकाशवाणी डायरेक्ट टॅपिंग, जसवंत टॉकिज डायरेक्ट टॅपिंगमधून पाणीपुरवठा बंद राहील. सतरंजीपुरा झोनमधील बस्तरवारी जलकुंभ क्रमांक १, २-अ व २-ब, शांतीनगर जलकुंभ, वांजरी विनोबा भावेनगर, इटाभट्टी डायरेक्ट टॅपिंगमधून नागरिकांना पाणी मिळणार आहे. नेहरूनगर झोनमधील नंदनवनमधील जुने जलकुंभ, नंदनवन जलकुंभ क्रमांक १ व २, सक्करदरा जलकुंभ क्रमांक १, २ व ३, ताजबाग व खरबी जलकुंभ तसेच लकडगंज झोनमधील भांडेवाडी, देशपांडे लेआऊट भरतवाडा, लकडगंज, मिनिमातानगर, सुभाननगर, कळमना, व पारडी येथील १ व २ क्रमांकाच्या जलकुंभावरून पाणीपुरवठा बंद राहील.

सध्या ती काय करते? 'स्वदेश' फेम गायत्री जोशीची कहाणी, वाचा...

या २८ जलकुंभाअंतर्गत शेकडो वस्त्या असून तेथील नागरिकांना सोमवारी पाणी मिळणार नाही. मंगळवारी सकाळीही पाणीपुरवठा बंद राहील. नागरिकांनी रविवारी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन ओसीडब्लूने केले आहे.

(संपाादन : प्रशांत राॅय)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur city's water supply will cut off on Monday