दहाही झोनमध्ये एकाचवेळी कारवाई; रस्ते, फुटपाथ मोकळे करण्यास सुरुवात

nagpur corporation action in ten zone
nagpur corporation action in ten zone

नागपूर : शहरातील दहाही झोनमध्ये महापालिकेने आजपासून अतिक्रमणाविरोधात कारवाई तीव्र करीत रस्ते, फुटपाथ मोकळे करण्यास सुरुवात केली. अनेकांनी जप्ती टाळण्यासाठी दुकानाबाहेर रस्त्यावर ठेवलेले साहित्य दुकानात कोंबले, तर काहींचे साहित्य जप्त करण्यात आले. जप्त साहित्याचा लिलाव करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहे. 

शहरातील अतिक्रमणाविरोधात आयुक्तांनी कठोर धोरण स्वीकारले. त्यांनी शनिवारी अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांसह दहाही झोनच्या सहाय्यक आयुक्तांना सर्व झोनमध्ये रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले होते. अतिक्रमण कारवाईत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे आज दहाही झोनच्या सहायक आयुक्तांनी अतिक्रमणविरोधात कारवाई सुरू केली. गांधीबाग झोनअंतर्गत असलेल्या मोमीनपुरा कब्रस्तान मार्गावरील जवळपास २५ अतिक्रमण हटविण्यात आले. याशिवाय धंतोली झोनमधील सुभाष रोडवरीलही अतिक्रमण काढण्यात आले. मंगळवारी झोनमधील सीआयडी कार्यालयाजवळ पथकाने कारवाई करून परिसर अतिक्रमणमुक्त केला. हनुमाननगर झोनमधील प्रभाग ३३ मध्ये बहुमजली इमारतीत पार्किंगच्या जागेत करण्यात आलेले अवैध बांधकामही तोडण्यात आले. नेहरूनगर झोनमधील भागातही रस्ते तसेच फूटपाथवरील अतिक्रमणधारकांविरोधात पथकाने कारवाई केली. सतरंजीपुरा झोनमधील मारवाडी चौक, दहिबाजार पूल परिसरातील फूटपाथवरील अतिक्रमण काढण्यात आले. अनेक भागात अतिक्रमणविरोधी पथक बघताच अतिक्रमणधारकांनी काढता पाय घेतला. काहींनी दुकानाबाहेर ठेवलेले साहित्य गोडावूनमध्ये पाठविले. उद्याही ही कारवाई सुरू राहणार असून आयुक्तांनी रस्ते व फूटपाथवरील अतिक्रमण काढण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे. मात्र, त्याचवेळी रस्त्यांवरील दुकानदारांत दहशत निर्माण झाली असून कसे जगायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

'अतिक्रमणासाठी अधिकारीच जबाबदार' - 
फुटपाथवरील तसेच रस्त्यावरील अतिक्रमणाकडे अ.भा. ग्राहक पंचायतने वारंवार लक्ष वेधले. परंतु, झोन अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अधिकाऱ्यांमुळेच अतिक्रमण वाढले असून पादचाऱ्यांसाठी फुटपाथ नाही. रस्त्यांवरील दुकानांमुळे वाहतूक कोंडी होत असून अपघाताची टांगती तलवार आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी अ. भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे यांनी केली. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com