मालवाहतुकीत नागपूर विभागाची आघाडी; चार मिलियन टन मालाची वाहतूक

Nagpur division leads in freight
Nagpur division leads in freight

नागपूर : मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडून मजल दरमजल करीत मालवाहतुकीच्या क्षेत्रात नवनवे आयाम स्थापित केले जात आहे. दोन्ही विभागांनी ऑक्टोबर महिन्यात आजवरची एका महिन्यातील सर्वश्रेष्ठ कामगिरी करून दाखविली. यामुळे रेल्वेच्या तिजोरीतही भर पडली. वेळेचे पालन करण्याच्या कामगिरीतही उतरोत्तर प्रगती साधली जात आहे. कोरोना काळातही रेल्वेचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने मालवाहतुकीवर भर देण्यात आला आहे. त्याचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने ऑक्टोबर महिन्यात ३.२४ मिलियन टन माल लोड करून वाहतूक केली. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात २.४५ मिलियन टन मालाचे लोडिंग करण्यात आले होते. गतवर्षीपेक्षा यंदा तब्बल ३२.४ टक्के अधिक मालाची लोडिंग करण्यात आली.

२९ ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी सर्वाधिक २ हजार ४३७ वॅगन माल लोड करण्यात आला. ही आजवरची विक्रमी कामगिरी आहे. यंदा दरमहा २.८८२ मिलियन टन मालच्या लोडिंगचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यापेक्षा सरासरी १२.४ टक्के अधिक लोडिंग केले जात आहे.

कोळसा वाहतुकीतही यंदा २.९०४ मिलियन टनांसह ३१. ३ टक्क्यांची वाढ नोंदविली गेली. २९ ऑक्टोबरला सर्वाधिक ३८ मालगाड्यांमध्ये कोळसा भरण्यात आला. मालवाहतुकीतून ऑक्टोबर महिन्यात २४९.७२ कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा १५.३ टक्क्यांची वृद्धी नोंदविली गेली. खाद्यान्नाच्या ५ मालगाड्या आणि स्टीलच्या ३ मालगाड्या नागपूर विभागातून पाठविण्यात आल्या.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानेही दमदार कामगिरी नोंदविली आहे. ऑक्टोबर महिन्यात दरदिवशी ३६७.७ वॅगन माल लोड करण्यात आला. आजवरची ही सर्वोत्कृष्ठ कामगिरी आहे.

आतापर्यंत सर्वाधिक ३३७.७ टक्के वॅगन लोडिंगचा विक्रम होता, तो मागे टाकण्यात यश आले आहे. ऑक्टोबर महिन्यात एकूण ११ हजार ३९८ वाघिणींमधून ०.७६५ मिलियन टन मालाची वाहतूक करण्यात आली असून, त्यातून ४५.६२ कोटींचा महसूल प्राप्त झाला.

गतवर्षीच्या तुलनेत माल वाहतुकीचे प्रमाण तब्बल ९९.०२ टक्के तर उत्पन्न १६२ टक्के अधिक आहे. याशिवाय ऑक्टोबर महिन्यात पार्सल ट्रेन व किसान रेलमधून सुमारे २ हजार टन पार्सन व शेतमालाची वाहतूक करण्यात आली. त्यातूनही ४१ लाख ७६ हजारांचा महसूल प्राप्त झाला.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com