भाजपला अंतर्गत धुसफूस भोवली? आघाडीच्या चक्रव्युव्हात अडकली

BJP defeated due to internal dispute
BJP defeated due to internal dispute

नागपूर : पुन्हा सत्तेत येण्यास आतुर असलेल्या भाजपला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक असलेले महापौर संदीप जोशी यांच्या पराभवाने जबर धक्का बसला आहे. महाविकासआघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांचा विजय झाल्याचे अधिकृत घोषित झाले नसले तरी ही केवळ औपचारिकता आहे. विशेष म्हणजे नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघात भाजपने आजवर कधीच पराभव बघितला नाही.

राज्यातील सत्तांतरानंतर तशी ही पहिलीच निवडणूक होती. फडणवीस यांच्या शहरातील निवडणूक असल्याने राज्याचे लक्ष येथील निकालाकडे लागले होते. फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेत्यांमध्ये संबंध सध्या चांगलेच ताणले गेले आहेत. त्यामुळे नागपूरमध्ये कुठल्याही परिस्थितीत भाजपचा पराभव करण्याचे आदेश वरूनच सर्व स्थानिक नेत्यांना देण्यात आले होते.

फडणवीस यांनाही याची कुणकुण होतीच. त्यामुळे शेवटचे दोन दिवस ते नागपूरमध्येच ठाण मांडून बसले होते. तत्पूर्वीसुद्धा त्यांनी दोन दिवस प्रचाराला वेळ दिला होता. सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्या होत्या. गुप्त बैठकासुद्धा घेतल्या. मात्र, त्यांना यावेळी आघाडीचा चक्रव्यूव्ह भेदता आला नाही.

विधानसभेच्या निवडणुकीत ओबीसी नेत्यांना डावलल्याचा फटकाही या निवडणुकीत भाजपला बसला. खडसे, तावडे, बावनकुळे यांना उमेदवारी नाकारणे तसेच पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे ओबीसींमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली होती. महाआघाडीच्या नेत्यांनी याचा पुरेपूर फायदा उचलला. ओबीसींमध्ये अन्याय झाल्याचे बिंबवण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले.

विदर्भात भाजपचे नेते म्हणून उदयाला आलेले चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभेच्या निवडणुकीत घरी बसवल्याने ओबीसी तसेच तेली समाजामध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती. भाजपसोबत असलेल्या तेली समाजात प्रचंड असंतोष उफाळून आला होता. यात काँग्रेसने पदवीधरमध्ये तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणारे अभिजित वंजारी यांनाच उमेदवारी दिल्याने एक गठ्ठा मतदार भाजपपासून दूर गेला.

गडकरी समर्थकही नाराज

माजी आमदार अनिल सोले यांना उमेदवारी नाकारणे हेसुद्धा भाजपला भोवले. ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक समजले जातात. आजवर या मतदारसंघावर गडकरी यांचेच वर्चस्व होते. त्यांचा शब्द चालत होता. त्यामुळे सोले यांची उमेदवारी पक्की मानली जात होती. मात्र, तरुण तुर्कांना केंद्रातून पाठबळ असल्याने गडकरी यांना न विचारता परस्पर निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

असुरक्षेतीची भावना

गडकरी यांचे महत्त्व कमी केले जात असल्याची चर्चा भाजपातच दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळे गडकरी समर्थक यांच्यातही असुरक्षेतीची भावना निर्माण झाली आहे. चंद्रपूरचे नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हेसुद्धा राज्यातील नेत्यांच्या रडारवर आहेत. एकूणच भाजपतील अंतर्गत धुसफूस पराभवाला कारणीभूत ठरली.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com