नागपूर पदवीधर निवडणूक: पराभव नक्की कोणाचा? भाजपचा की संदीप जोशींचा? 

अथर्व महांकाळ 
Friday, 4 December 2020

पदवीधर निवडणुकीचा निकाल आल्यानंतर महाविकास आघाडीच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले तर दुसरीकडे मात्र भाजपच्या गोटात पराभवाची निराशा होती. पण हा पराभव नक्की कोणाचा होता? भाजपचा की स्वतः संदीप जोशींचा? 

नागपूर: नागपूर शहराचे महापौर संदीप जोशी यांना पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. अनिल सोले यांना उमेदवारी न देता यावेळी भाजपने संदीप जोशी यांच्यावर जबाबदारी टाकली होती. संदीप जोशी यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह बघायला मिळत होता. मात्र निवडणुकीच्या निकाल लागला आणि भाजपने इतकी वर्ष राखून ठेवलेला गड महाविकास आघाडीच्या हाती गेला. मात्र या पराभवाचे कारण काय? 

क्लिक करा - बंगल्यामागे आढळली मानवी मृतदेहाची कवटी; ओळख पटताच उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

गेल्या ५८ वर्षांपासून नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा कधीही पराभव झाला नव्हता त्यामुळे महापौर संदीप जोशींवर हा बालेकिल्ला राखण्याची जबाबदारी होती. दुसरीकडे मात्र काँग्रेस महाआघाडीने यंदा प्रथमच अ‌ॅड. अभिजित वंजारी यांच्या रूपाने अधिकृत उमेदवार दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे बळ त्यांना मिळाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष भाजपला आव्हान देण्यासाठी सज्ज होते. निवडणुकीत तब्बल १९ उमेदवार असले तरी प्रत्यक्ष लढत संदीप जोशी आणि अभिजीत वंजारी यांच्यातच होती. 

पराभव नक्की कोणाचा? 

पदवीधर निवडणुकीचा निकाल आल्यानंतर महाविकास आघाडीच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले तर दुसरीकडे मात्र भाजपच्या गोटात पराभवाची निराशा होती. पण हा पराभव नक्की कोणाचा होता? भाजपचा की स्वतः संदीप जोशींचा? 

कार्यकर्त्यांमध्ये नाराजी?

नागपुरातील भाजपचे नेते  आणि माजी महापौर अनिल सोले यांना डावलल्यामुळे कार्यकर्त्यांचा एक गट अप्रत्यक्षपणे नाराज होता अशीं चर्चा रंगली होती. यामुळे संदीप जोशी यांचा पराभव झाला का याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. 

अधिक वाचा - ताडोबाला पर्यटनासाठी जाताना सुटले गाडीवरील नियंत्रण अन् घडला मृत्यूचा थरार

तुकाराम मुंढेंचे प्रकरण

कोरोनाकाळात तुकाराम मुंढे हे नागपूरचे आयुक्त झाले त्यावेळी महापौर संदीप जोशी यांच्यासह भाजपच्या अनेक नगरसेवकांनी त्यांच्या कामावर आणि कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळी संदीप जोशी आणि तुकाराम मुंढे यांच्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मतभेद  असल्याचे दिसून आले. मात्र त्यावेळीही नागपुरातील जनता तुकाराम मुंढेंच्या पाठीशी उभी राहिली. त्यामुळे संदीप जोशी जनतेच्या मनातून आपले स्थान कमी करत आहेत अशी शक्यता निर्माण झाली होती. 

एकूणच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जनतेने संदीप जोशी आणि भाजप यापैकी नक्की कोणाला नाकारले याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur graduation constituency election result who lost BJP or sandip joshi