ऐनवेळी रद्द झाले लॉन, मग काय नवरदेवाच्या कुटुंबीयांनी लढवली ही शक्कल...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 मार्च 2020

जिल्हा प्रशासनाच्या निर्णला सकारात्मक प्रतिसाद देत बतकी व डाहुले परिवाराने निश्‍चित झालेला लग्न सोहळा मोजक्‍या नातेवाईकांच्या उपस्थितीत उरकून घेण्याचा निर्णय घेत समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. बालपांडे व लटारे परिवारानेसुद्धा सामाजिक भान राखत लग्न सोहळा साधेपणाने उरकण्याचा आदर्शवत निर्णय घेतला आहे.

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या दहशतीमुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरात जमावबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. प्रशासनाने गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्यासंदर्भात "ऍडव्हायजरी' जारी केली आहे. मंगलकार्यालये, लॉनही बंद ठेवण्याबाबतही निर्देषित करण्यात आले आहे. नागपूरकरांनीही "प्रो ऍक्‍टिव्ह' भूमिका घेतली आहे. जागरूक नागरिक स्वत:हून भव्य लग्नसोहळे टाळून साधेपणावर भर देत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. 

जगभरात कोरोनाचा प्रदुर्भाव वाढत आहे. महाराष्ट्रात 39 तर नागपुरात 4 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. वाढत्या प्रकोपामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. अशा भयान स्थितीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपययोजनांसदर्भात दिशानिर्देश दिले आहेत. अधिक गर्दी होत असल्याने लग्नसोहळ्यांसाठी मंगलकार्यालये, लॉन देण्यावर प्रतिबंध आणला आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणावर जनजागरुती केली जात आहे. त्याची दखल घेत नागरिकही कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पुढे सरसावले आहेत. 

ठरलेले लग्न सोहळे लांबविण्याचे वृत्त जिल्हाभरातून येत आहे. तर, काहींनी ठरलेले लग्न साधेपणाने करून लोकांचे एकत्रिकरण टाळण्यावर भर दिला आहे. 

पार्किंगमध्ये लग्न 
एक युवकाने लग्नासाठी लॉन बुक केले होते. मात्र करोनामुळे लॉनने बुकींग रद्द केले. त्यानंतर एक हॉटेल बुक केले. सर्व पाहुण्यांना फोन करून स्थळ बदलल्याची सूचनाही दिली. मात्र आज मंगळवारी अचानक हॉटेलमधून फोन आला, तातडीने भेटायला बोलावले. हॉटेल चालकाने पैसे परत करून लग्न समारंभ करता येणार नाही असे सांगितले. दोन दिवसांवर लग्न ठेपले असल्याने सर्वच पेचात सापडले. शेवटी आता सोहळा मोजक्‍या पाहुण्यांना बोलावून फ्लॅटच्या पार्किंगमध्ये करण्याचा निर्णय युवकाच्या कुटुंबाने घेतला आहे.

- कोरोनाच्या दहशतीमुळे पुण्या-मुंबईतील विद्यार्थ्यांची घरवापसी, पालकांचा जिवात जीव

जिल्हा प्रशासनाच्या निर्णला सकारात्मक प्रतिसाद देत बतकी व डाहुले परिवाराने निश्‍चित झालेला लग्न सोहळा मोजक्‍या नातेवाईकांच्या उपस्थितीत उरकून घेण्याचा निर्णय घेत समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. बालपांडे व लटारे परिवारानेसुद्धा सामाजिक भान राखत लग्न सोहळा साधेपणाने उरकण्याचा आदर्शवत निर्णय घेतला आहे. दोन्ही विवाह 19 मार्चला वेगवेगळ्या ठिकाणी होणार होते. याशिवाय करुणा व प्रशांत यांचा 29 मार्च रोजी कुसुमताई वानखेडे सभागृहात आयोजित लग्न सोहळाही साधेपणाने केला जाणार आहे. यासंदर्भातील माहिती संबंधित परिवारांकडून व्हॉट्‌सऍप व अन्य माध्यमातून आप्तेष्ठांना कळविण्यात येत आहे. कुटुंबांनी दाखविलेल्या सामाजिक जागृतीसाठी त्यांचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur Lawn owner canceled booking on time