नागपूरचे महापौर संदीप जोशी यांचा राजीनामा

Nagpur Mayor Sandeep Joshi resigns
Nagpur Mayor Sandeep Joshi resigns

नागपूर  ः महापौर संदीप जोशी यांनी आज महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपविला. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारपरिषदेत ऑगस्टमध्ये केलेल्या महापालिका निवडणूक न लढण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले. पक्षाने दिलेली जबाबदारी सांभाळली. यापुढे भाजपच्या विचारासाठी झोकून देणारा कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याची पुस्तीही जोशी यांनी जोडली.

कोरोनातून बरे होताच महापौर संदीप जोशी यांनी आज त्यांच्या कक्षात राजीनामा देत असल्याची घोषणा केली अन् पत्रकारपरिषदेनंतर आयुक्तांकडे राजीनामा सोपविला. उपमहापौर मनीषा कोठेही यांनी त्यांच्या समवेत पदाचा राजीनामा दिला. मागील वर्षी २२ नोव्हेंबरला महापौरपदी निवड झाल्यानंतर वर्षभरात विविध उपक्रम राबविले. 

यातून शहराचे स्वच्छतेचे रॅंकींग सुधारले, जनता दरबार, हॅलो महापौर ॲप, वॉक ॲन्ड टॉक विथ मेयर, सामाजिक संस्थांसोबत ब्रेक फास्ट विथ मेयर या उपक्रमातून शहराच्या समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. एकूणच वर्षभराच्या कामावर समाधानी नसल्याचे नमुद करीत अनेक कामे राहून गेल्याची खंत त्यांंनी व्यक्त केली. शिल्लक कामे नियोजित महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासोबत चर्चा करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. 

महापौर निधीचा वापर शहरात सुलभ शौचालये बांधण्यासाठी करण्याचा निर्धार केला. सुलभ शौचालयांसाठी जागा शोधली, डिझाईन तयार केले, कार्यादेशही निघाले. परंतु तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापौर निधी खर्चालाही अडवून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच असे घडल्याचेही ते म्हणाले. आयुक्तांकडे राजीनामा दिला असला तरी दयाशंकर तिवारी यांच्या निवडीपर्यंत ते कार्यभार सांभाळणार आहे.

नव्या महापौरांची निवड पुढील सभागृहात होणार आहे. यासाठी स्थायी समितीकडून सभेची तारीख निश्चित केली जाणार असून त्यानंतर महापौरपदाच्या निवडीसंदर्भात विभागीय आयुक्तांना महापालिकेकडून पत्र दिले जाणार आहे. विभागीय आयुक्त नव्या महापौरांच्या निवडीचा कार्यक्रम घोषित करतील.


आयुक्तांचे कौतुक

तुकाराम मुंढे यांचा विषयच नको असे नमूद करीत महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त राधाकृष्णन बी. यांची मात्र कोरोना काळात केलेल्या कामाबाबत तसेच केलेल्या सहकार्याबाबत त्यांनी कौतुक केले. आयुक्त राधाकृष्णन यांनी पदाधिकाऱ्यांसोबत समन्वयाने कामे केल्याने मुंढेच्या काळात केवळ नऊ असलेल्या ॲम्बुलन्सची संख्या ६५ पर्यंत पोहोचली. एवढेच नव्हे कोव्हीड रुग्णालयांच्या संख्येत वाढ झालीच, आरोग्य सेवेचा दर्जाही उंचावल्याचे महापौर म्हणाले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com