ठरलं... हिंगणा मार्गावर मंगळवारपासून धावणार नागपूर मेट्रो

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन ते लोकमान्यनगरपर्यंतच्या हिंगणा मार्गावर मेट्रोच्या अनेक चाचण्या घेतल्या. सीएमआरएसनेही रेल्वे ट्रॅकसह स्टेशनची पाहणी करून मंजुरी दिली. आता महामेट्रोने या मार्गावरील मेट्रोला हिरवी झेंडी दाखविण्यासाठी 28 जानेवारीचा मुहूर्त निश्‍चित केला आहे.

नागपूर : अनेक महिन्यांपासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेली हिंगणा मार्गावरील मेट्रो रेल्वे मंगळवारपासून धावणार आहे. त्यामुळे हिंगणा मार्गावरील लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. शिवाय मेट्रोतून प्रवासाचे स्वप्नही साकार होणार आहे.

सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन ते लोकमान्यनगरपर्यंतच्या हिंगणा मार्गावर मेट्रोच्या अनेक चाचण्या घेतल्या. सीएमआरएसनेही रेल्वे ट्रॅकसह स्टेशनची पाहणी करून मंजुरी दिली. आता महामेट्रोने या मार्गावरील मेट्रोला हिरवी झेंडी दाखविण्यासाठी 28 जानेवारीचा मुहूर्त निश्‍चित केला आहे.

मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता सुभाषनगर मेट्रो स्टेशनवरून मेट्रोला हिरवी झेंडी दाखविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकार्पणाच्या कार्यक्रमात भाग घेतील. तर, केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी प्रत्यक्षरीत्या या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

- Union Budget 2020 : रोजगारनिर्मिती आणि गुंतवणूक

मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून, तर केंद्रीय मंत्री गडकरी प्रत्यक्ष हिरवी झेंडी दाखवून मेट्रोचे लोकार्पण करतील. या लोकार्पण समारंभात नगर विकामंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री व ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार, महापौर संदीप जोशी, खासदार कृपाल तुमाने, खासदार डॉ. विकास महात्मे, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील.

याशिवाय आमदार नागो गाणार, आमदार प्रकाश गजभिये, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते, आमदार समीर मेघे, आमदार विकास ठाकरे उपस्थित राहतील. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

- पहाटे फिरायला गेले अन्‌ पाहतात तर काय मुलगा होता रक्‍ताच्या थारोळ्यात
 

सहा स्टेशनची कामे पूर्ण
हिंगणा मार्गावरील ऍक्वा लाइनवर लोकमान्यनगर ते सीताबर्डी इंटरचेंज या 11 किमीच्या मार्गावरील दहापैकी सहा स्टेशन तयार झाले आहेत. यात लोकमान्यनगर, वासुदेवनगर, सुभाषनगर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, झाशी राणी आणि सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनचा समावेश आहेत. या मार्गावरील उद्योग, खासगी कंपन्यांतील चाकरमाने, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही या मेट्रोचा लाभ होणार आहे.

पर्यटनाचाही लुटता येणार आनंद
हिंगणा मार्गावर नागरिकांना आरामदायी प्रवासीसेवा अनुभवता येणार आहे. शिवाय या मार्गावरील अंबाझरी तलाव, स्वामी विवेकानंद स्मारक, लिटिल वूड, लिटिल वूड एक्‍स्टेन्शनमुळे मनमोहन व आकर्षक स्थळांचे दर्शन घेत पर्यटनाचाही आनंद प्रवाशांना लुटता येणार आहे. नुकताच सीएमआरएसने या मार्गावरील सोयीसुविधांची पाहणी करीत मेट्रो सुरू करण्याची परवानगी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur metro to run on hingna road from tuesday