आता नागपूरकरांना मिळेल घरातच आरोग्य शिक्षण

राजेश प्रायकर
Tuesday, 22 September 2020

मनपाची चमू ५१ हजार नागरिकांपर्यंत पोहोचल्याचा दावा महापालिकेने केला आहे. अनलॉक सुरू असताना कोरोना नियंत्रण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी शहरातील सर्वच घरांना दोन वेळा भेट देण्यात येईल.

नागपूर  : शहरात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेला सुरुवात झाली आहे. शहरातील सहा लाख घरांना भेटी देऊन मनपाचे पथक नागरिकांना कोरोनासंदर्भात आरोग्य शिक्षण देतील. पथकाद्वारे घरातील सर्व सदस्यांना व्यक्तीश: कोविडपूर्वी, कोविडमध्ये आणि कोविडनंतरच्या काळात घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शन करतील.

१५ सप्टेंबरपासून या मोहिमेला सुरुवात झाली असून, आतापर्यंत मनपाची चमू ५१ हजार नागरिकांपर्यंत पोहोचल्याचा दावा महापालिकेने केला आहे. अनलॉक सुरू असताना कोरोना नियंत्रण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी शहरातील सर्वच घरांना दोन वेळा भेट देण्यात येईल. आरोग्य शिक्षण, महत्त्वाचे आरोग्य संदेश, संशयित रुग्ण शोधणे तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी, आजार, लठ्ठपणा यासारख्या अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा - ते लांब बसून रडत होते; काही नागरिक बघून निघून गेले, पडाटे आले सत्य समोर
 

याच गृहभेटीच्या माध्यमातून ‘सारी' आणि ‘आयएलआय' रुग्णांचेही सर्व्हेक्षण केले जाणार आहे. कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षणासोबत ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन पातळी कमी असणे अशी कोविडसदृश लक्षणे असलेल्या नागरिकांची जवळच्या ‘फिवर क्लिनिक’मध्ये चाचणी केल्यानंतर पुढील उपचार सुरू करण्यात येईल. मोहिमेची जबाबदारी झोनस्तरावर अधिकाऱ्यांना देण्यात आली. 

सर्व्हेक्षणासाठी खासगी रुग्णालय, स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांचे सहकार्य घेण्यात येत आहे. जनसंपर्कासाठी लोकप्रतिनिधींचेही सहकार्य घेण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिली. सर्व्हेक्षणादरम्यान पथकाद्वारे घराच्या दाराबाहेर स्टीकर लावणे, घरातील प्रत्येक सदस्याची ॲपमध्ये नोंद करणे आणि त्यानंतर त्यांची तपासणी केली जाईल.

अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला
 

मोहिमेच्या यशासाठी रणनीती

सध्या झोनस्तरावर २७८ चमू कार्यरत असून, येत्या काही दिवसांत त्यात ३५० पर्यंत वाढ करण्यात येईल. मोहिमेअंतर्गत एक पथक दररोज ५० घरांना भेट देऊन संशयित कोविड तपासणी व उपचारासंदर्भात मार्गदर्शन करेल. एका पथकामध्ये एक आरोग्य अधिकारी व दोन स्वयंसेवक राहतील. प्रत्येक ५ ते १० पथकांमागे एक डॉक्टर उपचारासाठी राहील. पहिल्या टप्पा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या १५ दिवसांच्या कालावधीत तर १४ ते २४ ऑक्टोबर या १० दिवसांच्या कालावधी दुसरा टप्पा घेण्यात येणार आहे.

राज्यस्तरावर बक्षीस योजना

राज्य शासनाने व्यक्ती आणि संस्थांसाठी पुरस्कार योजना सुरू केली. व्यक्तींसाठी निबंध, पोस्टर, आरोग्य शिक्षण संदेशाच्या स्पर्धा घेण्यात येतील. ही योजना विद्यार्थी, पालक व सामान्य व्यक्तींसाठीही लागू राहील. स्पर्धेत पहिल्या क्रमांकावरील विजेत्याला ५ हजार, द्वितीय क्रमांकाला ३ हजार व तिसऱ्या क्रमांकासाठी २ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येईल. संस्थांनाही पुरस्कार देण्यात येईल. पहिल्या क्रमांकावरील संस्थेला ५० हजार, द्वितीय क्रमांकासाठी ३० हजार व तृतीय क्रमांकासाठी २० हजार रुपये रोख देण्यात येणार आहे.

संपादन : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur Municipal Corporation's survey under 'My Family' begins