नागपूर-नरखेड मेट्रो रेल्वेने जोडणार; मंत्रिमंडळाची मंजुरी

राजेश चरपे
Thursday, 15 October 2020

महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार महामेट्रोचे भागभांडवल या प्रकल्पामध्ये राहणार आहे. यासाठी केएफडब्ल्यू या संस्थेकडून कर्ज घेण्याची जबाबदारी व त्या संदर्भात पत्रव्यवहार करण्याची जबाबदारी महामेट्रोवर टाकण्यात आलेली आहे. नरखेड, वर्धा, रामटेक व भंडारा या शहरातून येणारे व जाणारे अनेक प्रवासी असतात.

नागपूर : नागपूर महामेट्रोचा विस्तार नागपूरच्या जवळच्या शहरांना जोडण्यासाठी पॅसेंजर ट्रेनऐवजी वातानुकूलीत मेट्रोने जोडण्याच्या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. नागपूरपासून जवळ असलेल्या नरखेड, भंडारा, वर्धा व रामटेक ही शहरे मेट्रोने जोडली जाणार आहेत. यात नागपूर ते नरखेड या ८५.५३ किलोमीटर मार्गाचा समावेश आहे. या दरम्यान ११ स्थानके राहणार आहेत.

नागपूर शहरातून होणाऱ्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी २०१८ मध्ये एक सामंजस्य करार करण्यात आला होता. परंतु, या करारात अनेक त्रुटी होत्या. केंद्र सरकारच्या संदर्भात असलेल्या या प्रकल्पासाठी राज्य मंत्रिमंडळाची परवानगीही तत्कालीन सरकारने घेतली नव्हती. या प्रकल्पाला आज रितसर राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याने या प्रकल्पात असलेल्या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत.

सविस्तर वाचा - मुलांनी आईला प्रश्न विचारताच सर्वच झाले शांत; काही सेकंदात आजी-आजोबांनी फोडला हंबरडा

महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार महामेट्रोचे भागभांडवल या प्रकल्पामध्ये राहणार आहे. यासाठी केएफडब्ल्यू या संस्थेकडून कर्ज घेण्याची जबाबदारी व त्या संदर्भात पत्रव्यवहार करण्याची जबाबदारी महामेट्रोवर टाकण्यात आलेली आहे. नरखेड, वर्धा, रामटेक व भंडारा या शहरातून येणारे व जाणारे अनेक प्रवासी असतात. याचा फायदा नागपूर शहरातील मेट्रोच्या प्रवासी संख्या वाढण्यासाठी सुद्धा होणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

असे आहेत टप्पे

हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे. यातील पहिला टप्पा २०२१ ते २०३१ या काळात पूर्ण होणार आहे. तर दुसरा टप्पा २०३१ नंतर सुरू होणार आहे. यात नागपूर ते नरखेड हा ८५.५३ किमी, नागपूर-वर्धा ७८.८ किमी, नागपूर-रामटेक ४१.६ व नागपूर-भंडारा रोड हा ६२.७ किलोमीटर रेल्वे मार्गाचा समावेश राहणार आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur-Narkhed metro will be connected by rail