गडकरी म्हणाले, शिवसेनेने सत्तेसाठी भगवा सोडला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जानेवारी 2020

खातेवापट करताना नाकीनऊ येत आहे. हे सरकार फारकाळ टिकेल असे दिसत नाही, असे गडकरी म्हणाले. 

नागपूर : केवळ सत्तेच्या लालसेसाठी कॉंग्रेससोबत आघाडी करून शिवसेनेने आता भगवा सोडला असल्याचा आरोप केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केला. 

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या उमरेड तालुक्‍यातील मांढळ येथील सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. सत्तेसाठी शिवसेनेने आपले हिंदुत्व, भगव्याचा त्याग केला. कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. दोन्ही कॉंग्रेसच्या पेचात शिवसेना सापडली आहे. मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करायला एक महिना लागला. आता खातेवापट करताना नाकीनऊ येत आहे. हे सरकार फारकाळ टिकेल असे दिसत नाही, असेही गडकरी म्हणाले. 

सर्वाधिक आमदार निवडून आले असतानाही भाजपला राज्यात सत्ता स्थापन करता आली नाही. शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावर दावा सांगून युती तोडली. त्यामुळे भाजपचे नेते नाराज झाले असून शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

शिवसेनेने कट्टर हिंदुत्व सोडले

गडकरी यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारात भिडले आहे. येथील सभांच्या माध्यमातून ते खुलेपणाने शिवसेना व महाआघाडीवर टीका करीत आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची विचारधारा एक नाही. कुठलेच धोरणही नाही. केवळ सत्ता आणि सत्ता हाच तीनही पक्षांचा अजेंडा आहे. याकरिता शिवसेनेने आपले कट्टर हिंदुत्व सोडले आहे. नागरिकत्व कायद्यालाही मनात नसताना शिवसेनेला विरोध करावा लागत असल्याचेही आपल्या भाषणात गडकरी म्हणाले. 

अबब! प्रतिष्ठित व्यक्ती कुंटणखान्याचे ग्राहक

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, nitin gadkari, shivsena, politics