नागपुरात कुख्यात गुंडाच्या खुनानंतर वस्तीतील लोकांनी व्यक्त केला आनंद...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जून 2020

मित्राच्या बहिणीच्या लग्नाचे जेवण आटोपून घरी जात असलेला कुख्यात गुंड अन्नू ठाकूर याचा सोनूच्या गॅंगने सापळा रचून खात्मा केला. अन्नूच्या हत्याकांडाची वार्ता परिसरात पोहचताच परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्‍त केला. या हत्याकांडात तीन आरोपींना अटक करण्यात आली. महबूब अली युसूफ अली, त्याचा भाऊ उस्मान अली युसूफ अली (रा. विनोबा भावेनगर) आणि मख्खन उर्फ मोहम्मद कलीम अन्सारी (रा. कुंदन गुप्ता नगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

नागपूर : कुख्यात गुंडाच्या हैदोसाने फुकटनगरातील नागरिक चांगलेच वैतैगले होते. त्याच्या जाचापासून कधी एकदाची सुटका होते अशीच अवस्था येथील लोकांची झाली होती. अशातच अचानक आलेल्या बातमीने लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

मित्राच्या बहिणीच्या लग्नाचे जेवण आटोपून घरी जात असलेला कुख्यात गुंड अन्नू ठाकूर याचा सोनूच्या गॅंगने सापळा रचून खात्मा केला. अन्नूच्या हत्याकांडाची वार्ता परिसरात पोहचताच परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्‍त केला. या हत्याकांडात तीन आरोपींना अटक करण्यात आली. महबूब अली युसूफ अली, त्याचा भाऊ उस्मान अली युसूफ अली (रा. विनोबा भावेनगर) आणि मख्खन उर्फ मोहम्मद कलीम अन्सारी (रा. कुंदन गुप्ता नगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अनुज उर्फ अन्नू ठाकूर सुदाम बघेल (वय 24, वनदेवीनगर) हा बुधवारी रात्री अकरा वाजता मित्र शाकीर याच्या बहिणीच्या लग्नाला गेला होता. जेवण केल्यानंतर मित्रासह दुचाकीने परत येत होता. फुकटनगरात सापळा रचून बसलेल्या उस्मान, मख्खन आणि मेहबूब यांनी अन्नू ठाकूरला अडविले. काही दिवसांपूर्वी अन्नूने मख्खनची बाईक जाळली होती. त्या बाईकच्या बदल्यात पैसे मागितले. परंतु, अन्नूने पैसे देण्यास नकार दिला. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. त्यानंतर तिन्ही आरोपींनी अन्नूला एका गल्लीत नेले. त्यानंतर तिघांनीही पाठीमागे लपविलेले शस्त्र काढले आणि अन्नूवर प्राणघातक हल्ला केला. रक्‍ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपींनी पळ काढला. घटनेची माहिती मिळताच यशोधरानगरचे ठाणेदार दीपक साखरे घटनास्थळावर पोहचले. या प्रकरणी परवेज अली करामत अली (रा. हमीदनगर) याच्या तक्रारीवरून हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला.

नुकताच आला कारागृहाबाहेर

अन्नू ठाकूर हा एका प्रकरणात मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. कोरोनामुळे अन्नू ठाकूरला जामीन दिला होता. त्यामुळे आठ दिवसांपूर्वीच मध्यवर्ती कारागृहातून सुटून बाहेर आला होता. जेलमधून सुटताच त्याने परिसरात दबादबा निर्माण करण्यासाठी रंगदारी सुरू केली होती. धमक्‍या देणे, शिवीगाळ करणे आणि मारहाण करणे सुरू केले होते.

अवश्य वाचा- चॉकलेटचे आमिष दाखवून 50 वर्षीय नराधमाने केला चिमुकलीवर बलात्कार

आरोपींना अटक

अन्नू ठाकूरचा खून केल्यानंतर तिनही आरोपी शहरातून बाहेर पळ काढण्याच्या तयारी होते. परंतु, तत्पूर्वीच यशोधरानगर पोलिसांनी आरोपींना सापळा रचून अटक केली. ठाकूर हत्याकांडामुळे परिसरातील नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे. अनेकांनी दुसऱ्या दिवशी सकाळी आनंद व्यक्‍त केला. त्यावरून परिसरात असलेला ठाकूरची दहशत दिसत होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur people celebration after murder of ruffian