बापरे! आयुष्यातील तब्बल पावणे दोन महिने नागरिक घालवतात वाहतूक सिग्नलवर; दररोज घालवतात इतकी मिनिटं  

राजेश प्रायकर 
Monday, 1 February 2021

दक्षिण नागपुरातील रिंग रोडपलिकडील व्यक्तीला बर्डीवर जायचे असेल तर मानेवाडा चौक, तुकडोजी पुतळा चौक, धंतोली पोलिस स्टेशन चौकातील सिग्नल पार करून जावे लागते. त्यापुढे सिव्हिल लाईनला जाताना व्हेरायटी चौक, झिरो माईल चौक पार करावा लागतो.

नागपूर ः शहरातील प्रत्येकच व्यक्तीला ‘ग्रीन लाइट' सुरू होईपर्यंत सिग्नलजवळ थांबावे लागते. अर्थात सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर पानटपरीनंतर सिग्नलवर थांबा बंधनकारकच आहे. घर ते नोकरीचे किंवा व्यवसायाच्या ठिकाणापर्यंत ये-जा करताना प्रत्येकाला एका वाहतूक सिग्नलवर किमान दोनदा थांबावे लागत आहे. हिशेब केल्यास एका नागपूरकराला दररोज पाच मिनिटे सिग्नलवर घालवावे लागत असून आयुष्यातील ५४ दिवस ४ तास यात जात असल्याचे दिसून येत आहे.

दक्षिण नागपुरातील रिंग रोडपलिकडील व्यक्तीला बर्डीवर जायचे असेल तर मानेवाडा चौक, तुकडोजी पुतळा चौक, धंतोली पोलिस स्टेशन चौकातील सिग्नल पार करून जावे लागते. त्यापुढे सिव्हिल लाईनला जाताना व्हेरायटी चौक, झिरो माईल चौक पार करावा लागतो. महालला जायचे असल्यास सक्करदरा चौक, जुनी शुक्रवारी चौकातून जावे लागते. सिव्हिल लाईनला अनेक कार्यालये असून येथे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. येथे पोहोचेपर्यंत एका व्यक्तीचे सिग्नलवर अडीच मिनिटे जातात. 

नक्की वाचा - सून आणि नातवांनी काढलं घराबाहेर अखेर चिमुकल्यांनी 'तिला' दिला खांदा; उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी

पूर्व नागपुरातील व्यक्तीला सिव्हिल लाईनकडे जाण्यासाठी सिग्नल असलेले टेलिफोन एक्सचेंज चौक, गंगा-जमना चौक, महात्मा गांधी चौक, अग्रसेन चौक, संविधान चौकातील सिग्नलवर थांबा घ्यावा लागतो. येथील नागरिकांनाही अडीच ते तीन मिनिटे लागतात. उत्तर नागपुरातील नागरिकांना बर्डी किंवा सिव्हिल लाईनला यायचे असल्यास इंदोरा चौक, कडबी चौक, संविधान चौकातील सिग्नलवर थांबावे लागते. त्यांनाही दोन मिनिटे लागतात. एवढाच वेळ परत येण्यासाठीही लागतो. 

शहरात १६० चौकांत वाहतूक सिग्नल असून एका व्यक्तीला पाच मिनिटे दररोज सिग्नलवर व्यतीत करावे लागते. व्यावसायिकही दररोज जेवढे फिरतात किंवा दुकानापर्यंत जातात. त्यांनाही एवढाच कालावधी दुकानापर्यंत जाताना किंवा साहित्य विक्रीसाठी फिरताना लागतो. त्यामुळे वर्षातील ३६५ दिवसांपैकी ६५ दिवस वगळल्यास एक व्यक्ती किमान ३०० दिवस चौकातून ये-जा करतो. वर्षातून एक व्यक्ती एक दिवस व एक तास सिग्नलवर घालवतो. 

आरटीओच्या नियमानुसार वयाच्या अठराव्या वर्षापासून दुचाकी किंवा तीन चाकी चालविण्यास सुरुवात केली जाते. मागील ऑक्टोबरमध्ये अमेरिकेतील एका नियतकालिकाच्या अभ्यासातून भारतीयांचे सरासरी वय ७० असल्याचे आढळून आले. सुरुवातीचे अठरा वर्षे कमी केल्यास एक व्यक्ती सरासरी ५२ वर्षे वाहन चालवितो किंवा वाहनातून प्रवास करतो. वर्षातून एक व्यक्ती एक दिवस व एक तास सिग्नलवर घालवतो. त्यानुसार एक नागपूरकर त्यांच्या आयुष्यातील ५४ दिवस ४ तास सिग्नलवर घालवीत असल्याचे अधोरेखित होत आहे.

जाणून घ्या - ऋतूंचा अजब खेळ! दोन दिवसांत तब्बल ६ अंशांनी घसरला पारा; फेब्रुवारीत 'या' दिवसांत पावसाचीही शक्यता   

भारतीयांच्या आयुष्यात १० वर्षांनी वाढ

अमेरिकेतील एका नियतकालिकाच्या अभ्यासात भारतीय नागरिकांच्या सरासरी आयुष्यात १९९० पासून आजपर्यंत १० वर्षांची घसघशीत भर पडल्याचे आढळून आले आहे. १९९० मध्ये भारतीयांचे सरासरी आयुष्यमान ५९.६ वर्षे होते. ते २०१९ मध्ये ७०.८ वर्षांवर पोहचले असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. आयुर्मान वाढीत केरळ आघाडीवर असून येथील नागरिकांचे सरासरी आयुर्मान ७७.३ वर्षे आहे. महाराष्ट्रातील नागरिकांचे आयुष्यमान ६८ ते ७४ वर्षे आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur people spend 5 minutes daily on traffic signal