
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी अजय जाधव हा सीताबर्डी बाजारातील फ्रेण्ड्स कापडाच्या शोरुममध्ये आला. त्याने पोलिसांच्या वर्दीसाठी लागणारे साहित्य मागितले. तीन स्टार, राऊंड कॅप, लाल शूज, केन आणि नेम प्लेट खरेदी करायचे असल्याचे सांगितले.
नागपूर ः एका व्यक्तीने पोलिसांची खाकी वर्दी खरेदी करून ऐटीत पोलिस अधिकाऱ्याचा आव आणत लोकांना लुटण्याचा प्लान बनविला. मात्र, पोलिस अधिकाऱ्याच्या खांद्यावरील स्टार, शूज, बेल्ट आणि टोपी खरेदी करतानाच त्याला खऱ्या पोलिसांनी अटक केली. त्यामुळे त्या व्यक्तीचे पोलिस अधिकारी बनून लूटमार करण्याच्या योजनेवर पाणी फेरले गेले. अजय शिवदास जाधव (रा. बदनापूर,जालना) असे अटकेतील तोतया पोलिसांचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी अजय जाधव हा सीताबर्डी बाजारातील फ्रेण्ड्स कापडाच्या शोरुममध्ये आला. त्याने पोलिसांच्या वर्दीसाठी लागणारे साहित्य मागितले. तीन स्टार, राऊंड कॅप, लाल शूज, केन आणि नेम प्लेट खरेदी करायचे असल्याचे सांगितले. दुकानदाराने त्याला विचारणा केली असता त्याने चंद्रपूर पोलिस दलात सहाय्यक पोलिस निरीक्षक असल्याचे त्याने दुकानदाराला सांगितले.
दुकानदाराला संशय आला. दुकानदाराने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिस नियंत्रण कक्षाने सीताबर्डी पोलिसांना कळविले. माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी अजय याला ओळखपत्र मागितले. त्याच्याकडे ओळखपत्र द्यायला तयार नव्हता. त्यामुळे त्याला ताब्यात घेतले आणि सीताबर्डी पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली. पिशवीत पट्टा आढळला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अजय याला अटक केली.
पोलिस अधिकारी बनून वाहनचालकांना थांबवायचे. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून दंडाची भीती दाखवून पैसे कमवायचे, असा प्लान अजयने बनविला होता. त्यामुळे त्याने पोलिस शिपाई बनण्यापेक्षा थेट एमपीएसी पास असलेला सहायक पोलिस निरीक्षक बनण्याचे ठरविले होते. मात्र अधिकारी बनण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली.
अजय जाधव हा पोलिसांना ठाण्यात आणल्यानंतरही एपीआय असल्याचा दावा करीत होता.त्याच्याकडे महाराष्ट्र पोलिसाचा लोगो असलेले आयकार्ड, नेमप्लेट आणि बाहेरगावी तपासासाठी जात असल्याची ड्युटी पास (डीपी) होती. त्यामुळे तो गेल्या काही वर्षापासून तोतया पोलिस बनत असल्याचे लक्षात आले. अजयला लॉकअपमध्ये दोन बाजीराव मारताच तो पोपटासारखा बोलू लागला.
संपादन - अथर्व महांकाळ