शेतमजूर असलेल्या दिलीपची 'ही' संपत्ती पाहून व्हाल थक्क; संग्रहात आहेत तब्बल ५० हजार अमूल्य वस्तू 

सायराबानो अहमद 
Wednesday, 25 November 2020

दिलीप महात्मे यांनी जवळपास 1500 लेख हाताने लिहून काढले आहेत. त्यांच्याकडे जवळपास 2,500 दुर्मीळ नाणी आहेत. एवढंच नव्हे तर त्यांच्याकडे 30 हजारांच्या वर न्यूजपेपरचे कटिंग आहेत.

धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) ः सोशल मिडियावर आपण अनेकदा लेख वाचतो. वर्तमानपत्र किंवा मासिकातील लेख वाचतो. खूपच आवडलेत तर कधी एखादा दुसरा लेख संग्रहित करून ठेवतो. 'तो' मात्र तेवढ्यावर थांबत नाही. त्याला आवडलेला लेख तो पुन्हा पुन्हा वाचतो. आपल्या मोत्यांसारख्या सुंदर अक्षरात हाताने लिहून काढतो. या हस्तलिखितांचा संग्रह बाईंड करून ठेवतो. हा भन्नाट छंद जोपासत आहे. धामणगाव तालुक्‍यातील पेठ रघुनाथपुर या लहानशा खेड्यातील दिलीप वसंतराव महात्मे हा युवक.

दिलीप महात्मे यांनी जवळपास 1500 लेख हाताने लिहून काढले आहेत. त्यांच्याकडे जवळपास 2,500 दुर्मीळ नाणी आहेत. एवढंच नव्हे तर त्यांच्याकडे 30 हजारांच्या वर न्यूजपेपरचे कटिंग आहेत. अडीच हजारांच्या आसपास क्वाईन्सचा संग्रह आहे. आपली शेतमजुरीची कामे सांभाळून हा युवक सदोदित नव्या प्रयोगाकडे वाटचाल करीत आहे.

अधिक वाचा - आईच्या हंबरड्याने पोलिसांचे पाणावले डोळे; घरातून निघून गेलेल्या मुलाचा घेतला फास्टट्रॅक शोध

आजकाल आपल्याला हाताने लिहायचा भारी कंटाळा येतो. सोशल मीडियावर चॅटिंग करताना आपण पूर्ण स्पेलिंग लिहीत नाही. शॉर्टकटच मारतो. साध्या दोन अक्षरी ओके चाही आपण 'के 'करतो. पत्र लिहिणे, वाचलेले चांगले उतारे वहीत लिहून काढणे, तर दूरचीच गोष्ट. दिलीप महात्मे हा युवक शेतमजूरी करतो.

लिहून काढली १५०० पानं 

त्याने स्वत:च्या अक्षरात जवळपास 1,500 पानं लिहून काढलीत. त्याचे थोडेथोडके नव्हेत, तर चार खंड झालेत. 'प्रसिद्ध व्यक्ती', 'प्रेरणा व शोध' दोन भागांत आणि हिंदीत 'ऐतिहासिक और भौगोलिक' अशी छान शीर्षकही त्याने दिलीत. त्याने जवळपास 10 हजार 478 पानांवर जवळपास 30 हजार कात्रणे गोळा करून चिकटवलीत. त्यांचे ग्रंथासारखेच खंड करून बांधणी केली. विषयांचे वैविध्य पाहिलं तर आपले डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत.

रक्तातच वाचनाची आवड 

आई मंदाबाईंना भजनाचा छंद. वडील वसंतरावांना वृत्तपत्र वाचण्याची सवय. मोठा भाऊ दिनेश नियमित भगवद्गीता वाचतात. तर वहिनी वेदिका यांच्या नियमित वाचनात ग्रामगीता असते. परी आणि आयुष हे दिलीपचे पुतणी, पुतण्या. वाचनाची आवड असणाऱ्या परिवारातच दिलीप लहानाचा मोठा झाला. त्यामुळे स्वाभाविक वाचन त्याच्या रक्तातच उतरलं. शाळेत मूल्यशिक्षणाचे पाठ व्हायचे. त्यामुळे वाचनाची गोडी वाढत गेली. वाचता वाचता त्याला वृत्तपत्रातील फोटोदेखील आकर्षित करायला लागलेत. 

आली एक भन्नाट कल्पना 

काही विषय त्याला खूप आवडायला लागलेत. ते संग्रही असावेत, असे त्याला वाटायला लागले. जे आवडलं, ते कापून एका वहीत चिकटवून ठेवायला त्याने सुरुवात केली. अनेक विषयांची सरमिसळ एकाच कात्रणवहीत झाली. त्याच्या डोक्‍यात मग एक भन्नाट कल्पना आली. त्याने विषयांचे वर्गीकरण केले. इतिहास, राजकारण, देश-विदेश, अध्यात्म, विज्ञान, कला, क्रीडा, महामानव, प्रसिद्ध व्यक्ती, जनरल नॉलेज या प्रमाणे त्याने त्याच्या कात्रणवह्या तयार केल्या.

हेही वाचा - आता बांबूच्या बाटलीने प्या पाणी, नैसर्गिक चवीसोबत आरोग्याचंही रक्षण

नवी पिढी वाचनापासून दूर जात आहे. त्यांनी वर्तमानपत्रं वाचावीत. जगभरातल्या संस्कृतीचा, इतिहासाचा, वैशिष्ट्यांचा अभ्यास करावा. वर्तमानपत्रांतील कात्रणांचा माझा संग्रह लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी पाहावा. शाळा, कॉलेजसह, विविध मंडळे, संस्थांनी ही प्रदर्शनी आयोजित करावी. मला मानधनाची फारशी अपेक्षा नाही. प्रदर्शनासाठी जो काही किरकोळ खर्च लागेल, तो मिळाला तरी पुरे. हे सगळे वैभव सर्वांपर्यंत पोचलं पाहिजे, हीच अपेक्षा. मी साधा शेतमजूर आहे. शिक्षणही पूर्ण करू शकलो नाही. तरी ज्ञानाची ओढ आहे. ही ज्ञानाची लालसा सर्वांमध्येच निर्माण व्हावी, म्हणून माझी ही धडपड.
- दिलीप महात्मे, 
पेठ रघुनाथपूर, ता. धामणगाव रेल्वे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man written 1500 pages in his hand writing in Amravati