नागपूर पोलिसांची मोठी कारवाई! घरफोड्या करणाऱ्या चौघांच्या आवळल्या मुसक्या; १२ लाखांचे सोने जप्त

अनिल कांबळे 
Tuesday, 16 February 2021

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्‍वर हरिश्‍चंद्र पराते (५८, रा.श्री. महालक्ष्मीनगर, न्यू नरसाळा रोड) येथे राहतात. ते ९ फेब्रुवारीला कुटुंबासह बाहेर गेले होते. दरम्यान चोरट्यांनी त्यांचे घर फोडले.

नागपूर ः घरफोडी केल्यानंतर कोणताही मागमूस नसताना डीसीपी कार्यालयातील सायबर टीमच्या मदतीने हुडकेश्‍वर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. आरोपींकडून १२ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोने आणि आलिशान कार चोरट्यांकडून जप्त केली. संमेत ऊर्फ पोंग्या संतोष दाभणे (२०), अंकित साहेबराव बेले (२०), प्रदीप रामप्रसाद हातगडे (३४) आणि एक महिला आरोपी अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्‍वर हरिश्‍चंद्र पराते (५८, रा.श्री. महालक्ष्मीनगर, न्यू नरसाळा रोड) येथे राहतात. ते ९ फेब्रुवारीला कुटुंबासह बाहेर गेले होते. दरम्यान चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. घरातील अलमारीत ठेवलेले २८२ ग्रॅम वजनाचे (किंमत १२ लाख ७० हजार) दागिणे चोरट्यांनी लंपास केले होते. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. परंतु चोरट्यांचा सुगावा पोलिसांना लागत नव्हता. 

हेही वाचा - डोक्याला मार लागलेली आई विश्‍वासच ठेवायला तयार नव्हती...

अखेर पोलिस उपायुक्त कार्यालयातील सायबर टीमचे दीपक तर्हेकर आणि मिथुन नाईक यांनी तांत्रिक तपासावर भर दिला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पद्धतीचा वापर केला. त्यामुळे एका चोरट्याबाबत धागा हाती लागला. त्यानंतर हुडकेश्‍वर पोलिसांनी संमेत ऊर्फ पोंग्या दाभणेला अटक केली. त्याला खाक्या दाखवताच त्याने चौघांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्याने प्रदीप हातगडे याला सोन्याचे दागिणे दिल्याचे सांगितले. 

त्यावरून प्रदीपला अटक केली. प्रदीपने चोरीचे दागिणे पत्नीच्या मदतीने ओम ज्वेलर्स सराफा दुकानाचे मालक सुनील काटोले याला विकल्याची कबुली दिली. सराफा व्यापारी काटोले याने चोरीचे दागिने खरेदी केल्याचे सांगितले. पोलिसांनी सराफाकडून २८२ ग्रॅम सोन्याची लगदी जप्त केली. तिसरा आरोपी अंकित बेले यालासुद्धा अटक करण्यात आली. 

हेही वाचा - ‘मतदान का केले नाही, तुमच्यामुळे आम्ही सरपंच होऊ शकलो...

ही कारवाई डीसीपी डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनात हुडकेश्‍वरचे पीआय प्रतापराव भोसले, डीबीचे स्वप्नील भुजबळ, हवालदार दीपक मोरे, राजेश मोते आणि सायबर एक्सपर्ट दीपक तर्हेकर आणि मिथुन नाईक यांनी केली.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur police caught 4 thieves and with 12 lac gold