esakal | दिवाळी असूनही पुणे बस रिकामीच; डिझेलचे पैसे निघणे कठीण   
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Pune bus is empty even in diwali

राज्याची लोकवाहिनी असणाऱ्या लालपरीवर प्रवाशांचा विश्वास आजही कायम आहे. परंतु, कोरोना महामारीने सारेच गणित बिघडविले. दिवाळीच्या पर्वावर प्रत्येकाचीच स्वगृही परतण्यासाठी धडपड असते.

दिवाळी असूनही पुणे बस रिकामीच; डिझेलचे पैसे निघणे कठीण   

sakal_logo
By
योगेश बरवड

नागपूर ः कोरोनाच्या धास्तीने एसटीची प्रवासी संख्या चांगलीच खालावली आहे. पुणे फेरीची अवस्था अन्य फेऱ्यांच्या तुलनेत फारच दयनीय म्हणावी अशीच आहे. पुण्याकडे जाणाऱ्या बसेस केवळ १० ते १२ प्रवाशांना घेऊन रवाना होत आहेत. या फेऱ्यांमधून अन्य खर्च सोडाच डिझेलचे पैसे निघणेही दुरापास्त झाले आहे. काळ अडचणीचा असला तरी लोकवाहिनी हे लौकिक सार्थ ठरविण्यासाठी एसटीची धडपड सुरू आहे.

राज्याची लोकवाहिनी असणाऱ्या लालपरीवर प्रवाशांचा विश्वास आजही कायम आहे. परंतु, कोरोना महामारीने सारेच गणित बिघडविले. दिवाळीच्या पर्वावर प्रत्येकाचीच स्वगृही परतण्यासाठी धडपड असते. परिणामी दरवर्षी दिवाळीत लालपरी खचाखच भरून धावत असते. पुण्याच्या बसेसमध्ये अशीच स्थिती असते. 

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी खासगी बसचालक त्यांच्या किमती अनेक पटींनी वाढवितात. प्रवाशांची होणारी लूट थांबविण्यासीठी सरकारला नियमावलीही तयार करावी लागली. यंदा परिस्थिती फारच वेगळी आहे. शाळा, महविद्यालये, शिकवणी वर्ग बंदच आहेत. 

नोकऱ्या गमावणाऱ्या अनेकांनी पूर्वीच आपले घर गाठले. परिणामी पुणे मार्गावरील बसेसमध्ये यंदा ‘रश’ म्हणावा तशी परिस्थिती नाही. नागपूरहून जाणाऱ्या बसेसमध्ये १० ते १२ प्रवासी असतात. काही फेऱ्या तर सात ते आठ प्रवाशांना घेऊनच रवाना झाल्याची माहिती पुढे आली.

पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या बऱ्यापैकी आहे. पुण्यावरून फेऱ्यांच्या नियोजनासाठी इथून बसेस पाठविणेही क्रमप्राप्त आहे. यामुळे मंगळवारपासून पुण्याला दररोज १० फेऱ्या गणेशपेठेतील मध्यवर्ती स्थानकावरून सोडण्यात येत आहेत. तेवढ्याच फेऱ्या पुणावरून येत आहेत. दिवाळीनंतर प्रवासी संख्या नेमकी याउलट असेल असे जाणकार सांगतात.

अधिक वाचा - महाविकास आघाडीत बिघाडी; काँग्रेसने उमेदवार दिल्यावरही राष्ट्रवादीची  पदवीधर निवडणुकीत उडी ​
.
शिवशाही बसेस अपुऱ्या

पुण्याच्या ज्यादा फेऱ्यांची व्यवस्था करण्यात शिवशाही बसेसची संख्या कमी पडत असल्याने काही एशियाड बसेस लावण्यात आल्या. पण, याप्रकारावर प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. लांबवरचा प्रवास असल्याने शिवशाहीच असावी असा प्रवाशांचा आग्रह आहे.


संपादन - अथर्व महांकाळ