प्रवाशांनो दोन तासांपूर्वी गाठा रेल्वेस्थानक, अन्यथा होणार गैरसोय

योगेश बरवड
Saturday, 10 October 2020

मुंबई दुरांतो, पुणे हमसफर, विदर्भ व महाराष्ट्र एक्स्प्रेस तसेच अजनीहून पुण्यासाठी दोन साप्ताहिक ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वेने यापूर्वीच जाहीर केले आहे. या गाड्या विशेष गाड्या म्हणून धावणार आहेत. याच मालिकेत आता नागपूर-अमृतसर साप्ताहिक ट्रेनची घोषणा आज करण्यात आली.

नागपूर : टाळेबंदीच्या नियमांमध्ये हळूहळू शिथिलता येत असतानाच रेल्वे सेवाही पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. नियमित गाड्यांची संख्या टप्प्याने वाढविली जात आहे. यामुळे रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी होणार आहे. त्यातच कोव्हिड-१९ नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. सर्वप्रकारच्या पूर्वतपासण्यांसाठी दोन तासांपूर्वीच स्थानकावर पोहोचणे आवश्यक आहे. विलंब झाल्यास गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

मुंबई दुरांतो, पुणे हमसफर, विदर्भ व महाराष्ट्र एक्स्प्रेस तसेच अजनीहून पुण्यासाठी दोन साप्ताहिक ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वेने यापूर्वीच जाहीर केले आहे. या गाड्या विशेष गाड्या म्हणून धावणार आहेत. याच मालिकेत आता नागपूर-अमृतसर साप्ताहिक ट्रेनची घोषणा आज करण्यात आली. त्यानुसार दररोज व साप्ताहिक गाड्यांची वर्दळ वाढणार आहे. यामुळे प्रवाशांची गर्दीही पूर्वीप्रमाणेच वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन आणि प्रवाशांची तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना गाडीच्या वेळेच्या दोन तास अगोदर रेल्वेस्थानकावर पोहोचण्याची सूचना करण्यात आली आहे. 

हेही वाचा - सरकार बदलूनही 'सिकलसेल एक्सलंस सेंटर' कागदावरच, लाखो रुग्ण अत्याधुनिक उपचारापासून वंचित

केवळ कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच स्थानकात प्रवेश मिळणार आहे. विमानतळाप्रमाणेच ही व्यवस्था आहे. प्रवासी आत येताच थर्मल स्क्रिनिंगसह तिकिटांची डिजिटल तपासणी व प्रवासी तोच असल्याची खात्री केली जाईल. ताप किंवा आजारी असलेल्यांना प्रवासाची परवानगी मिळणार नाही. स्वयंचलित आत्मा प्रणालीद्वारे ही तपासणी होईल. मास्क लावलेल्या प्रवाशांनाच आत प्रवेश मिळेल. लागलीच सॅनिटायझेशन केले जाईल. ही व्यवस्था लक्षात घेता प्रवाशांनी किमान दोन तास अगोदर येऊन संभाव्य गैरसोय टाळण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

हेही वाचा - ऑनलाइन फसवणूक : उसनवारी घेऊन मोबाईल मागवला, पण मोबाईलही आला नाही अन् मुलगाही गमावला

अमृतसरसाठी वातानुकूलित ट्रेन - 
नागपूरहून अमृतसरसाठी साप्ताहिक वातानुकूलित स्पेशल ट्रेन चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे. १७ ऑक्टोबरपासून या सेवेचा शुभारंभ होईल. ०२०२५ नागपूर-अमृतसर ही साप्ताहिक विशेष गाडी १७ ऑक्टोबरपासून प्रत्येक शनिवारी रवाना होईल. याचप्रमाणे ०२०२६ अमृतसर-नागपूर ही साप्ताहिक विशेष गाडी १९ ऑक्टोबरपासून दर सोमवारी अमृतसर येथून परतीच्या प्रवासाला निघेल. दोन्ही गाड्यांची संरचना, वेळ व थांबे नागपूर अमृतसर-नागपूर एसी एक्सप्रेसप्रमाणे असेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur railway appeal to passenger for early arriving