esakal | २०० वर्षांत पहिल्यांदाच सक्करदरा तलाव फेब्रुवारीतच पडला कोरडा, अखेर पाणी मुरले कुठे?

बोलून बातमी शोधा

nagpur sakkardara lake dried in february for first time in 200 years }

गेल्या अनेक वर्षांपासून या तलावांच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. २०१४ मध्ये या तलावातून जवळपास १८०० ट्रक गाळ काढून खोलीकरण करण्यात आले होते. त्यापूर्वीही अनेक वर्षे तसेच २०१४ नंतरही फेब्रुवारीत हा तलाव कधीच कोरडा पडला नाही.

२०० वर्षांत पहिल्यांदाच सक्करदरा तलाव फेब्रुवारीतच पडला कोरडा, अखेर पाणी मुरले कुठे?
sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिण नागपुरातील नागरिकांना गारव्याची अनुभूती देणारा ऐतिहासिक सक्करदरा तलाव फेब्रुवारीमध्येच कोरडा पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरवर्षी फेब्रुवारीमध्ये दहा ते पंधरा फुटांपर्यंत पाणी असलेल्या या तलावाचे पाणी मुरले कुठे? असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडला आहे. गेल्या दोनशे वर्षांत प्रथमच फेब्रुवारीमध्ये तलाव आटल्याचे सोनझरी परिसरातील नागरिकांनी नमुद केले. 

हेही वाचा - नातेवाईकांच्या घरी पाहुणचार आटोपून परतीला निघाली महिला, रेल्वे स्थानकावर पोहोचली अन् सर्वच संपलं

गेल्या अनेक वर्षांपासून या तलावांच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. २०१४ मध्ये या तलावातून जवळपास १८०० ट्रक गाळ काढून खोलीकरण करण्यात आले होते. त्यापूर्वीही अनेक वर्षे तसेच २०१४ नंतरही फेब्रुवारीत हा तलाव कधीच कोरडा पडला नाही. मे-जूनमध्ये तलावाची पातळी खाली जात होती. परंतु, तलावात काहीतरी पाणी दिसत होते, असे या परिसरातील नागरिकांनी सांगितले. १९ एकरातील या तलावात ३० फूटपर्यंत पाणी साठविण्याची क्षमता आहे. यंदा पाऊसही चांगला झाला. तरीही फेब्रुवारीमध्येच हा तलाव कोरडा पडला. सौंदर्यीकरणाचे अनेकदा स्वप्न दाखविण्यात आले. परंतु, या तलावाकडे नागपूर सुधार प्रन्यास गेल्या दहा वर्षांपासून दुर्लक्ष केल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला. नासुप्र खासगी संस्थेकडे तलाव व बाजूलाच लागून असलेल्या उद्यानाच्या देखभालीचे काम दिले. परंतु, या कंत्राटदाराने त्याकडे दुर्लक्ष केले. नासुप्रच्या उदासीनतेचा तलाव बळी पडत असल्याचे दिसून येत आहे. माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी अनेकदा या तलावाला भेट दिली. त्यांनी या तलावाच्या पुनर्जिवनासाठी ८.५० कोटी रुपये मंजूर करून आणले होते. या तलावाचे ऐतिहासिक महत्त्व बघता तो वाचविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निधी आणल्याचे त्यांनी नमुद केले. परंतु, आताच्या निष्क्रीय सरकारमुळे निधीच मिळत नसल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. 

हेही वाचा - पोलिसांना जंगलात दिसले भांडे, भाजीपाला, राशन; आत शिरताच बसला मोठा धक्का

राज्य सरकारकडून निधीच नाही - 
तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी साडेआठ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. संरक्षक भिंत, जॉगिंग ट्रॅक आदीचा कामात समावेश होता. तलावाच्या पूर्व भागाला संरक्षक भिंत बांधण्यात आली. परंतु, राज्यात सत्तांतर झाले अन् या तलावाला देण्यात येणारा निधीही आटला, असे नेहरूनगर झोनमधील अधिकाऱ्याने नमुद केले. सहा महिन्यांपूर्वी तलावाचे काम सुरू होते. या कामामुळे तलावाचे झरेच बुजले असावे, अशी शंकाही एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.