तांत्रिक लोचा : विद्यापीठाचे सर्व्हर बसले; दावे ठरले फोल

The Nagpur university server shutdown on exzam time
The Nagpur university server shutdown on exzam time

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षेचे विघ्न सरता सरत नाही आहे. पहिल्या दिवशीच्या तांत्रिक लोच्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व्हर बसले. त्यामुळे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील परीक्षा स्थगित करण्याची नामुष्की विद्यापीठावर शुक्रवारी (ता.९ )ओढवली. यावरून विद्यापीठाचे परीक्षेच्या तयारीबाबतचे सर्व दावे फोल ठरल्याचे दिसून आले.

विद्यापीठाच्या परीक्षा ८ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे ठरले. मात्र, पहिल्याच दिवशी अगदी पहिल्या पेपरपासूनच विद्यार्थ्यांना ओटीपी मिळत नसल्याची तक्रार समोर आली. या प्रकाराने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, विद्यापीठाकडून केवळ ३१६ विद्यार्थी परीक्षेला मुकल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी (ता. ९) सकाळी पहिला टप्पा सुरळीत पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात विद्यापीठाचे सर्व्हर डाऊन झाल्याने एकाही विद्यार्थ्याला परीक्षा देता आली नाही.

विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना लॉगीनसुद्धा करता आले नाही. त्यामुळे विद्यार्थी चांगलेच हैराण झाले. विद्यापीठाकडून सातत्याने प्रयत्न करूनही यश न आल्याने शेवटी विद्यापीठाने पत्र काढून शुक्रवारचे सर्व पेपर स्थगित केल्याचे कळवले. दरम्यान, शनिवारी परीक्षा सुरळीत होतील असा दावा विद्यापीठाकडून करण्यात आला आहे.

हे पेपर झाले रद्द

काल घेण्यात आलेल्या विद्यापीठाच्या परीक्षेत दुसऱ्या टप्प्यातील जनसंवाद अभ्यासक्रमातील मीडिया लॉ ॲन्ड एथिक्स, बीए फिलॉसॉफी, मराठी, बीएफएतील ॲस्थेटिक्स ॲन्ड क्रिटिसिझम, तिसऱ्या टप्पात बीएसस्सी कॉम्प्युटर सायन्स, बायो टेक्नॉलॉजी, अप्लाइड फॉरेन्सिक केमिस्ट्री, प्रोग्रामिंग इन जावा, चौथ्या टप्प्यातील फुड टुरिझम, क्वालिटी ॲनालिसिस ऑफ टेक्सटाईल, मशीन व्हिजन ॲन्ड इमेज प्रोसेसिंग, इथिकॅल हॅकिंग फंडामेंट हे पेपर रद्द करण्यात आले.

प्रवेशपूर्व परीक्षांवर सावट

पदवी अभ्यासक्रमात अंतिम वर्षाचे अनेक विद्यार्थी देशातील नामवंत संस्थांमध्ये प्रवेश घ्यायच्या प्रयत्नात असतात. यासाठी प्रवेशपूर्व परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांनी केली आहे. मात्र, विद्यापीठाच्या परीक्षा लांबत राहिल्यास विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व परीक्षांना मुकावे लागेल अशी भीती वाटत आहे.

विद्यार्थ्यांनी काळजी करू नये
स्थगित करण्यात आलेले पेपर रविवारी किंवा योग्य तारखेला घेण्यात येतील. विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
- डॉ. प्रफुल्ल साबळे,
संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

तर गोंधळ उडाला नसता
विद्यापीठाने आपली क्षमता यूजीसी व सरकारला सांगायला हवी होती. विद्यापीठाने खरी क्षमता सांगितली असती तर गोंधळ उडाला नसता. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक प्रफुल्ल साबळे यांनीही चूक मान्य केली. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
- हेमंत गडकरी,
सरचिटणीस, मनसे

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com