आम्हाला ऑफलाईन नको आॅनलाईन परीक्षाच हवी

मंगेश गोमासे
Wednesday, 21 October 2020

विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या परीक्षा ८ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आल्यात. परीक्षेच्या पहिल्या दिवसापासून अ‍ॅपसंदर्भातील तांत्रिक अडचणींचा विद्यार्थ्यांना सामना करावा लागला.

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षांमध्ये पहिल्या चार दिवसांत आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकले. अशा विद्यार्थ्यांना आता ऑफलाईन परीक्षेचा पर्याय देण्यात आला आहे. मात्र, करोनाच्या भीतीमुळे विद्यापीठाने ऑफलाइन ऐवजी पुन्हा ऑनलाईन परीक्षाच घ्यावी अशी मागणी केली जात आहे.

विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या परीक्षा ८ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आल्यात. परीक्षेच्या पहिल्या दिवसापासून अ‍ॅपसंदर्भातील तांत्रिक अडचणींचा विद्यार्थ्यांना सामना करावा लागला. मात्र, त्यानंतरही जवळपास ९५ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. 

सध्या विद्यापीठाच्या परीक्षेची गाडी काहीशी रुळावर आली असली तरी अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहत आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी कुठला पेपर दिला नाही. 

क्लिक करा - आता लायसन्ससाठी कुठेही जायची गरज नाही; घरबसल्या पुढील पद्धतीने काढा लर्निंग लायसन्स
 

त्याची वेळ, दिवस आणि पेपर न देण्याचे कारण नोंदवायचे आहे. याआधारे विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांचा ऑफलाईन परीक्षेसाठी नकार असून, अनेक विद्यार्थी त्यांनी पुन्हा एकदा ऑनलाईन परीक्षाच घ्यावी अशी मागणी करीत आहेत.
 

परीक्षेची गाडी रुळावर

विद्यापीठाच्या मंगळवार आणि बुधवारच्या परीक्षांमध्ये काही विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या जोडणीमुळे काहीशा समस्या आल्या. मात्र, विविध विषयांमधील बहुतांश विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे परीक्षा दिल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. परीक्षेच्या काही वेळाआधीपासून विद्यार्थ्यांना लॉगिनची सोय करून दिल्याने अनेक समस्या दूर झाल्याचा दावाही विद्यापीठाने केला आहे.

बीएस.स्सी पेपर स्थगित

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची अंतिम सत्र परीक्षा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेच्या सुरळीतपणाला बुधवारी खंड पडला. त्यामुळे विद्यापीठाला बुधवारचा पेपर स्थगित करुन पुन्हा ही परीक्षा घेण्याची घोषणा करावी लागली. आता हा पेपर गुरुवारी सकाळी आठ वाजता पुन्हा घेण्यात येणार असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले. बुधवारी सायंकाळपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना फोनवर एसएमएस पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 

संपादन  : अतुल मांगे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur university students reject offline exams