Video : टायफाईड झाला तरी वरिष्ठ अधिकारी सुटी देत नाहीत, महिला पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

यशोदा नावाची महिला पोलिस कर्मचारी पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे. कोरोनामुळे तिची ड्युटी लकडगंज पोलिस स्टेशनमध्ये लावण्यात आली होती. गेल्या 12 एप्रिलपासून ती लकडगंज पोलिस ठाण्यातून ड्युटी करते.

नागपूर : टायफाईडमुळे आजारी असलेल्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला सुटी देण्यासाठी वरिष्ठ आधिकारी त्रास देत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी त्रास देत असल्यामुळे तिला आपल्या मनातील खदखद व्यक्‍त करण्यासाठी चक्‍क सोशल मीडियाचा सहारा घ्यावा लागला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून शिस्तीचे खाते म्हणून ढोंग करीत असलेल्या पोलिस दलाची प्रतिमा धुळीस मिळाली आहे.

 
विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यशोदा नावाची महिला पोलिस कर्मचारी पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे. कोरोनामुळे तिची ड्युटी लकडगंज पोलिस स्टेशनमध्ये लावण्यात आली होती. गेल्या 12 एप्रिलपासून ती लकडगंज पोलिस ठाण्यातून ड्युटी करते. कर्तव्य बजावत असताना यशोदाची 10 मे रोजी अचानक प्रकृती बिघडली. ती ड्युटी करून सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने घरी पोहचली. तिने 11 मे रोजी राखीव पोलिस निरीक्षक (आरपीआय) रामानंद सिंग यांच्याशी संवाद साधला. तिने प्रकृती बरी नसल्याचे सांगून सुटी मंजूर करावी, अशी पीआय सिंग यांना विनंती केली. मात्र, पीआय सिंग यांनी मनमानी करीत तिला सुटी देण्यास नकार दिला आणि ड्युटीवर जॉईन न झाल्यास कारवाई करण्याची धमकी दिल्याची माहिती आहे.

आजारी महिला पोलिस सुटीसाठी त्रस्त 
त्यानंतर यशोदा ही लकडगंज पोलिस स्टेशनला गेली. तेथील पीआय नरेंद्र हिवरे यांना तिने सुटी मागितली. त्यांनी पोस्टिंग मुख्यालय असल्यामुळे तेथून सुटी घेण्यास सांगून तिची बोळवण केली. आजारी असलेली यशोदा पुन्हा मुख्यालयात गेली. तेथे आरपीआय सिंग यांना सुटी मागितली. त्यांनी पुन्हा सुटीसाठी नकार देत लकडगंज पोलिस स्टेशनमध्ये पाठवले. लकडगंज पोलिस ठाण्यातून आणि मुख्यालयातून सुटीसाठी झुलवत असल्याचे बघून ती पोलिस उपायुक्‍तांकडे गेली. परंतु तेथेही तिच्या हाती निराशा आली. त्यामुळे तिच्यासमोर कोणताही पर्याय उरला नव्हता. शेवटी ती स्वतःहून एका खासगी रूग्णालयात दाखल झाली. डॉक्‍टरांनी तिला टायफाईड झाल्याचे सांगितले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहे. 
 
आम्ही कर्मचारी आहोत, रोबट नाहीत 
"साहेब आता अती होत आहे हे. आमचा अंत पाहू नका. आम्ही महिला पोलिस कर्मचारी आहोत... रोबट नव्हे. मला हक्‍काची सुटी पाहिजे आहे.' अशा शब्दात तिने वरिष्ठांना आर्जव केली आहे. वादग्रस्त असलेल्या आरपीआय रामानंद सिंगच्या मनमानीला बळी पडलेल्या यशोदाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली खदखद व्यक्‍त केली आहे. 

तुम्हाला रडवेल ही बातमी... चाळीस दिवसांच्या बाळाला घेऊन ओल्या बाळंतीनीला करावा लागला सतराशे किमीचा प्रवास

दर तिसऱ्या दिवशी पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्याचा दावा करणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा दावा फोल ठरला आहे. पोलिस रूग्णालय केवळ नावापुरते राहिले आहे. तेथील डॉक्‍टरांना प्रचारकांचे कामे सांगितले जात आहे. सॅनिटायझर पोहचवणे आणि पोलिसांच्या योजनांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी डॉक्‍टरांचा वापर होत असल्याची चर्चा पोलिस विभागात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur women constable fignting for leave, video viral