मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका भोवली; नागपूरच्या युवकाला गुजरातच्या राजकोट येथून अटक

योगेश बरवड
Monday, 26 October 2020

मुंबई व नागपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत समीतला अटक केली. चौकशीनंतर त्याला मुंबईला नेले जाणार असल्याची माहिती आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत नागपूर पोलिसांनी या कारवाईला दुजोरा दिला नाही. शिवसैनिकांकडून कारवाईचा दावा करण्यात येत होता.

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या संदर्भात अपमानजनक भाषेचा वापर करीत आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावरून प्रसारित करणाऱ्या नागपूरच्या समीत ठक्कर याला गुजरातच्या राजकोट येथून अटक करण्यात आल्याचे समजते. नागपूर व मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत त्याच्या मुसख्या आवळल्याचे कळते.

समीत ठक्कर मूळचा नागपूर येथील रहिवासी आहे. त्याचे ट्विटर अकाउंट भाजप नेते व कार्यकर्ते फॉलो करतात. त्याने उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्याबाबत अपशब्दाचा वापर करीत जून व जुलै महिन्यात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केले होते. त्याने प्रामुख्याने ट्विटरचा उपयोग केला होता. अन्य नेत्यांविषयीसुद्धा त्याने आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता.

सविस्तर वाचा - आई महिनाभरापासून बेपत्ता असताना बहिणींचे झाले अपहरण; आरोपीचे नाव समोर येताच सर्वांना बसला धक्का

त्याच्या विरोधात मुंबईचे व्हीपी रोड पोलिस ठाणे, बीकेसी सायबर विभाग तसेच नागपूरच्या सीताबर्डी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याने मुंबई उच्च न्यायालयातून अंतरिम संरक्षण मिळविले होते. पोलिस त्याच्यावर पाळत ठेवून होते. मुंबई व नागपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत समीतला अटक केली. चौकशीनंतर त्याला मुंबईला नेले जाणार असल्याची माहिती आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत नागपूर पोलिसांनी या कारवाईला दुजोरा दिला नाही. शिवसैनिकांकडून कारवाईचा दावा करण्यात येत होता.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur youth arrested from Rajkot in Gujarat