यशोगाथा : परंपरागत व्यवसायाला दिली आधुनिकतेची जोड आणि घेतली या व्यवसायात भरारी

Nagpur youth's success in footwear industry
Nagpur youth's success in footwear industry

नागपूर  ः वडील पादत्राणे तयार करणारे कारागीर, त्यांचे कष्ट बघून काळीज तुटायचे. समज येताच ‘लाथ मारीन तिथून पाणी काढीन’असे ठरवले. परंपरेने मिळालेल्या कामाला अंतर द्यायचे नाही. तर त्याच क्षेत्रात भरारी घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फुटवेअर टेक्नॉलॉजी विषयात अभियांत्रिकीची पदव्युत्तर पदवी घेतली. वडिलोपार्जित व्यवसायालाच अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड दिली. आज त्याच व्यवसायात भरारी घेतली असून देशातील सर्वच राष्ट्रीय खादी प्रदर्शनात त्याचा स्टॉल ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरते. ही किमया साध्य करून दाखविली आहे नागपूरकर प्रमोद मारसिंगे या हरहुन्नरी युवकाने.

प्रमोदने राजीव गांधी इंजिनिअरिंग संस्थेतून बीटेक केले. चेन्नई येथील सेंट्रल फुटवेअर ट्रेनिंग इंस्टिट्यूटमध्ये फुटवेअर टेक्नॉलॉजी या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर चेन्नई येथील पीए फुटवेअरमध्ये नोकरी केली. पण, नोकरीत मन रमले नाही. एका क्षणात नोकरी सोडली, वडील होमकुमार यांच्या व्यवसायात हातभार लावून उत्पादनाचा दर्जा वाढविण्याचा संकल्प केला. वडिलांच्या हातात गुण असल्याने त्यांच्या चप्पल, बुटाला चांगली मागणी होती. 

वडिलांनीच खादी ग्रामोद्योग आयोगाकडे कर्जासंदर्भात विचारणा केली. काही अडचणी आल्या; पण प्रमोदच्या जिद्दीपुढे त्या फारकाळ टिकू शकल्या नाहीत. कर्ज मिळाले आणि दीपाली शूज इंडस्ट्रीजची मुहूर्तमेढ रोवली गेली. वडिलांचा अनुभव आणि प्रमोदकडील ज्ञान या संयोगातून दर्जेदार, सुरेख, आकर्षक, टिकाऊ पादत्राणे तयार होऊ लागली.

गुणवत्तापूर्ण उत्पादने ग्राहकांच्या पसंतीला उतरले. स्थानिक प्रदर्शनातून खादी ग्रामोद्योग आयोगाच्या राष्ट्रीय प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी मिळाली. पहिल्याच प्रदर्शनात प्रमोदच्या स्टॉलवरील बूट आणि चपलांचा माल संपला. त्यामुळे एक दिवसापूर्वीच स्टॉल बंद करावा लागला. 

मुंबई, अहमदाबाद, औरंगाबाद, सुरत, बंगळूर आणि भोपाळ येथील राष्ट्रीय प्रदर्शनात ग्राहकांचे लक्ष वेधले. आताही तेथील ग्राहक फोन करून बूट आणि चपलांची मागणी करतात. यातून आत्मविश्वास वाढला. उत्पादनात वाढ करण्यात येत आहे. खासगी कंपन्या आणि राज्य आणि केंद्र सरकार पुरस्कृत सार्वजनिक उपक्रमांमध्ये लागणारे सेफ्टी शुज तयार करण्याचा संकल्प आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. काळाची गरज लक्षात घेत बूट, चप्पल आणि सॅन्डलची होम डिलेव्हरीही सुरू केलेली आहे.

 
आधुनिकतेची कास दिल्याने  वाढला व्यवसाय
आजचे युग तंत्रज्ञान आणि कल्पकतेचे आहे. वेगळे काहीतरी करण्याची धडपड आणि इच्छाशक्तीच्या बळावर कोणत्याही क्षेत्रात यश गाठणे शक्य आहे. दर्जा स्थापित करा, गुणवत्ता सुस्थापित करा, पैसा चालून येतो, पैसा गौण आहे. हे एका विशिष्ट पातळीवर पोहोचल्यानंतर लक्षात येते. वडिलोपार्जित व्यवसाय असला तरी त्याला आधुनिकतेची कास दिल्याने व्यवसाय वाढला.
-प्रमोद मारसिंगे, युवा उद्योजक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com