नागपुरातही आहेत 'डान्सिंग अंकल'; वजन 105 किलो तरीही...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

नृत्य व अदांच्या बाबतीत नागपूरकर इटनकर श्रीवास्तव यांच्यापेक्षा कुठेच कमी नाहीत. त्यांची अदा पहिल्यानंतर नक्‍कीच आपल्याला कल्पना येईल. अलीकडेच तालुका क्रीडा अधिकारी म्हणून रिटायर्ड झालेले इटनकर शम्मी कपूर, राजेश खन्ना व गोविंदाचे जबरदस्त फॅन आहेत.

नागपूर : गोविंदाच्या गाण्यावर धमाल नृत्य करणारे भोपाळचे संजीव श्रीवास्तव 'डान्सिंग अंकल' म्हणून देशभर लोकप्रिय आहेत. मात्र नागपुरातही असेच एक 'डान्सिंग अंकल' आहेत, हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल. श्रीवास्तव यांच्यासारखीच शरीरयष्टी असलेले आणि त्यांच्यासारखेच हुबेहूब दिसणारे व नृत्य करणारे नागपूरकर 'डान्सिंग अंकल' सर्वत्र प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये गोविंदाप्रमाणे नृत्य करून नागपूरकर चाहत्यांची वाहवा मिळविली आहे.

दिलीप इटनकर असे त्यांचे नाव आहे. नृत्य व अदांच्या बाबतीत नागपूरकर इटनकर श्रीवास्तव यांच्यापेक्षा कुठेच कमी नाहीत. त्यांची अदा पहिल्यानंतर नक्‍कीच आपल्याला कल्पना येईल. अलीकडेच तालुका क्रीडा अधिकारी म्हणून रिटायर्ड झालेले इटनकर शम्मी कपूर, राजेश खन्ना व गोविंदाचे जबरदस्त फॅन आहेत. त्यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. कॉलेजचे 'गॅदरिंग' असो वा विद्यापीठाचा 'युथ फेस्टिव्हल'. पार्टी असो किंवा नातेवाईकांचे लग्न समारंभ. किंवा मग 'स्पोर्टस डिपार्टमेंट'चा एखादा कार्यक्रम. इटनकर यांचा फर्माईशी डान्स हमखास असतोच.

सविस्तर वाचा : हुंडा दिला नाही म्हणून तो पत्नीशी करायचा अनैसर्गिक कृत्य

आज ते 59 वर्षांचे आहेत आणि वजन 105 किलो. तरीही त्यांच्यात तितकाच उत्साह व जोश आहे. त्यांना गोविंदाच्या गाण्यावर नृत्य आवडत असले तरी, त्यांची स्वत:ची वेगळी स्टाईल आहे. आपल्या नृत्यात ते शम्मी, राजेश खन्ना व गोविंदा या तिघांच्याही स्टेप्सचा प्रभावीपणे वापर करतात. कार्यक्रमांमध्ये अनेकवेळा त्यांना त्यांच्या अर्धांगिनीही साथ देतात, हे उल्लेखनीय.

निवृत्तीनंतरही इटनकर यांनी आपले नृत्यप्रेम जपले आहे. जेव्हाजेव्हा त्यांना संधी मिळते, तेव्हातेव्हा लाज न बाळगता ते दिलखुलास नृत्य करतात. या क्षेत्रात पुढे जाण्याची त्यांची खुप इच्छा होती. दुर्दैवाने योग्य व्यासपीठ आणि संधी न मिळाल्याने त्यात त्यांना यश आले नाही. तशी खंत त्यांनी बोलून दाखविली. पण त्याचवेळी संजीव श्रीवास्तवसारख्याशी तुलना करण्यात येत असल्याबद्दल त्यांना आनंदही आहे. हा माझ्यासाठी फार मोठा बहुमान असल्याचे आज, मंगळवारी 59 वा वाढदिवस साजरा करणारे इटनकर म्हणाले.

अवश्य वाचा : बापच मुलीला म्हणायचा, 'इतर माणसांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडील' अन्‌...

इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा आनंद

मी शासनाच्या क्रीडा विभागात नोकरी केली असली तरी, माझा वैयक्‍तिक शौकही पूर्ण केला. मला जेव्हाजेव्हा व्यासपीठ मिळते, तेव्हातेव्हा बिनधास्तपणे स्टेजवर जाऊन "डान्स' करतो. माझ्या नृत्यामुळे मित्रमंडळी व नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलत असेल तर त्याचा मला आनंदच आहे.
दिलीप इटनकर, नागपूरचे 'डान्सिंग अंकल'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur's 'Dancing Uncle'