कोरोनाने दिला उपराजधानीला नवा रोजगार, वाचा काय ते...

Nagpur's Employment in PPE kit manufacturing
Nagpur's Employment in PPE kit manufacturing

नागपूर : कोरोनाने जगभरात थैमान घातले असून अनेक व्यवसाय, उद्योगांना फटका बसला. मात्र, याच कोरोनामुळे मास्क, पीपीई किटच्या नव्या उद्योगाची पायाभरणी झाली असून, शहरातही अनेक कापड व्यावसायिक पीपीई किट निर्मितीकडे वळले आहेत. केंद्र सरकारचे निकष पूर्ण करीत नागपुरात पीपीई किट निर्मिती केली जात आहे. अनेक उत्पादक शहराची गरज पूर्ण करतानाच इतरांनाही पुरवठा करीत असल्याचे चित्र आहे.

कोरोना रुग्णाची तपासणी आदी करताना डॉक्‍टर तसेच कोरोनाग्रस्तांसाठीही पीपीई किटचा वापर केला जात आहे. देशात सुरुवातीला पीपीई किटचा तुटवडा निर्माण झाला. परंतु, आज केंद्र सरकारने अनेक कंपन्या तसेच उद्योजकांना पीपीई किट निर्मितीसाठी परवानगी दिली.

केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या निकषानुसारच पीपीई निर्मिती होत असून, हा उद्योग गेल्या दोन महिन्यांत चांगलाच बहरल्याचे चित्र आहे. पुढे आणखी काही वर्षे कोरोनाचा प्रभाव राहण्याची शक्‍यता लक्षात घेता अनेक नवे उद्योजक तसेच कापड व्यावसायिकांनी या व्यवसायात पाय रोवण्यास सुरुवात केली.
 

संत्रानगरीही पीपीई किट निर्मितीत योगदानासाठी तयार झाली आहे. शहरात तूर्तास केवळ बोटावर मोजण्याइतपत व्यावसायिक आहेत. त्यातील यश टेक्‍सटाइलचे संचालक सत्यनारायण मेहाडिया यांनीही पंधरा दिवसांपूर्वी या व्यवसायात पाय ठेवले. केंद्र सरकारच्या निकषानुसार डीआरडीओने त्यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून त्यांनी गेल्या दोन आठवड्यापासून व्यवसाय सुरू केला.

वेगळ्या प्रकारचे प्लॅस्टिक आणि कापड याचा वापर करून दिवसाला 1200 पीपीई किट तयार केली जात आहे. सरकारी आरोग्य यंत्रणेला सध्या पीपीई किट पुरविण्यात येत असल्याचे मेहाडिया यांनी "सकाळ'सोबत बोलताना नमूद केले. याशिवाय होलसेल दरात विक्री केली जात आहे.

सध्या सुरुवात असल्याने स्वतःचेच भांडवल या व्यवसायात गुंतविले. परंतु, बॅंकाकडूनही या उद्योगासाठी कर्जपुरवठ्याची सुविधा आहे. मात्र, अद्याप सरकारचे परिपत्रक बॅंकापर्यंत पोहोचले नसल्याने सध्या तरी बॅंकांनी कर्ज देण्याबाबत हात वर केले असल्याचे चित्र आहे.

एका दिवसात 1200 किट
केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे पीपीई किटची निर्मिती केली जात आहे. एका दिवसात 1200 पीपीई किट तयार केली जात असून विक्रीही केली जात आहे. नुकताच या व्यवसायासाठी डीआरडीओने परवानगी दिली.
- सत्यनारायण मेहाडिया, यश टेक्‍सटाइल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com