#SaturdayPositive कर्तृत्वाच्या बळावर दिव्यांगांच्या आयुष्यात फुलवला 'कमल'

नरेंद्र चोरे
शनिवार, 4 जानेवारी 2020

अनेक व्यक्‍ती नोकऱ्यांसाठी कमल यांना फोन करून मागणी करतात. बोलता व ऐकू येत नसल्यामुळे ही मुले अशा ठिकाणी नोकऱ्या करतात, तिथे सर्वसामान्यांशी कमी संपर्क येतो. नोकरी मिळवून देण्यासोबतच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यातही त्यांचे कार्य उल्लेखनीय राहिले. त्यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या दिव्यांग निधी तरारेने राज्य व राष्ट्रीयस्तरावर अनेक पदके जिंकून थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतली.

नागपूर : स्वार्थाने भरलेल्या आजच्या समाजात मायबाप व भाऊ-बहिणींना दूर लोटणारे शेकडो जण नजरेस पडतात. परंतु, त्याच समाजात परक्‍यांसाठी आयुष्य वेचणारेही मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. शंकरनगर येथील मूकबधिर विद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राचार्य कमल वाघमारे या अशाच व्यक्‍तींपैकी एक. कमल यांनी आतापर्यंत शाळेतील असंख्य गोरगरीब मूकबधिर मुला-मुलींना विविध ठिकाणी नोकऱ्या लावून त्यांच्या अंधारलेल्या आयुष्यात उजेड निर्माण केला. त्यांचे हे कर्तृत्व निश्‍चितच समाजासाठी प्रेरणादायी आहे. 

आयुष्यभर दिव्यांग मुलांच्या सहवासात राहिल्यानंतर कमल यांना या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काहीतरी चांगले करावे, अशी इच्छा झाली. त्यामुळे या मुलांना रोजगार उपलब्ध करून स्वत:च्या पायावर उभे करण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने या कामात त्यांना शाळा व्यवस्थापन व विविध सामाजिक संघटनांची मदत मिळाली. सर्वप्रथम त्यांनी या मुलांना रोजगारासाठी आवश्‍यक असलेले प्रशिक्षण दिले. कुणाला केक बनविण्यात प्रोत्साहित केले तर कुणाला तांत्रिक प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन केले. कुणी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. त्या आधारावर अनेकांना मुंबई महापालिकेसह विप्रो, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, रॅडिसन ब्ल्यू, सदर येथील वॉकीटॉकी हॉटेल, पेट्रोलपंप, बिगबाजार, ब्युटी पार्लर, टेक्‍स्टाईल मिल, हाउसकिपिंग, नाशिक येथील पैठणी व्यवसायात नोकरीला लागल्या.

हेही वाचा - रंगेल पतीचा पाडला मुडदा

अनेक व्यक्‍ती नोकऱ्यांसाठी कमल यांना फोन करून मागणी करतात. बोलता व ऐकू येत नसल्यामुळे ही मुले अशा ठिकाणी नोकऱ्या करतात, तिथे सर्वसामान्यांशी कमी संपर्क येतो. नोकरी मिळवून देण्यासोबतच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यातही त्यांचे कार्य उल्लेखनीय राहिले. त्यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या दिव्यांग निधी तरारेने राज्य व राष्ट्रीयस्तरावर अनेक पदके जिंकून थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतली. 

वेळप्रसंगी त्यांनी मुलांना आर्थिक मदतही केली. त्यांच्या प्रयत्नातून अनेकांची नि:शुल्क आरोग्य तपासणी करण्यात आली. औषधोपचारासह चष्मेही मिळवून दिलेत. तसेच गरिबीमुळे शिक्षण सोडणाऱ्यांनाही त्यांनी शाळेत जाण्यास प्रोत्साहित केले. केवळ शालेय मुलीच नव्हे, विवाहित महिलांनाही त्यांनी शिक्षण व प्रशिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे केले.

अधिक वाचा - ...अन्‌ त्याने जिल्हाधिकाऱ्यांसमोरच काढली फिनाइल बॉटल

कर्तृत्वाची समाजानेही घेतली दखल

कमल वाघमारे शाळेच्या प्राचार्य असताना मुलांसाठी शाळेत सीसीटीव्ही, ग्रीनजिमसह अनेक दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यात. त्यांच्या प्रयत्नातून शाळेच्या डॉ. मीनल सांगोळे यांना राष्ट्रपतींचा आदर्श शिक्षक पुरस्कारदेखील मिळाला. वाघमारे यांच्या कर्तृत्वाची समाजानेही दखल घेतली. विदर्भगौरव व समाजभूषणसह अपंग महिला विकास पुरस्कार, ऑरेंजसिटी डीफ असोसिएशन, समाजकल्याण विभाग व आदिवासी विभागातर्फे त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. 

घसघशीत कमाई

वाघमारे यांनी आतापर्यंत तीनशेवर मूकबधिर मुला-मुलींना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ही मुले महिन्याला सात हजारांपासून ते 35 हजार रुपयांपर्यंतची घसघशीत कमाई करीत आहेत. यातील बहुतांश मुले-मुली दहावी-बारावी झालेले व आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत हे विशेष. "सक्षम'सारखी स्वयंसेवी संस्था व चिटणवीस सेंटरसह अनेक सामाजिक संघटनांच्या सहकार्यामुळेच आपण हे समाजकार्य करू शकलो, असे कमल वाघमारे या मोठ्या मनाने कबूल करतात.

काय - Video : मुलांशी केली मैत्री म्हणून घरच्यांनी बंद केले शिक्षण

दिव्यांगांना पाहिजे तो मानसन्मान नाही 
दिव्यांग मुलांना अजूनही समाजात पाहिजे तो मानसन्मान मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करावे, अशी इच्छा निर्माण झाली. त्यांना रोजगार मिळाल्यास ते स्वत:च्या पायावर उभे राहून सर्वसामान्यांसोबत ताठ मानेने समाजात जगू शकतील. या भावनेतून मी हे समाजकार्य केले. माझ्या प्रयत्नामुळे अनेक मूकबधिर मुलांचे भले झाले, याचा मनस्वी आनंद आहे. 
- कमल वाघमारे, 
सेवानिवृत्त प्राचार्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur's kamal waghmare work for the disabled