अरे हे काय, वेळापत्रकातून पेपरचे नावच गायब; नागपूर विद्यापीठाचा घोळ 

मंगेश गोमासे
Thursday, 29 October 2020

विद्यापीठाच्या परीक्षा जाहीर झाल्यानंतर सुरुवातीच्या आठवड्यात तांत्रिक चुकांमुळे विद्यार्थी त्रस्त झाले होते. त्यानंतर ॲपमध्ये बदल करण्यात आल्याने काही दिवस पेपर सुरळीत घेण्यात आले. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पेपरमध्ये तांत्रिक चुका होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

नागपूर  ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत होणाऱ्या चुका संपता संपत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. सोमवारी घेण्यात आलेल्या एमए अभ्यासक्रमाच्या परीक्षेत दुपारी दीड वाजता विद्यार्थ्यांनी लॉगइन केले असता, त्यांना "नो परीक्षा शेड्यूल नाऊ" (आता परीक्षा नाही) असे बघावयास मिळाले. याप्रकाराने विद्यार्थी बरेच गोंधळले. दुसरीकडे विषयांच्या यादीतून आजचा पेपरच गायब असल्याचे चित्र दिसून आले.

विद्यापीठाच्या परीक्षा जाहीर झाल्यानंतर सुरुवातीच्या आठवड्यात तांत्रिक चुकांमुळे विद्यार्थी त्रस्त झाले होते. त्यानंतर ॲपमध्ये बदल करण्यात आल्याने काही दिवस पेपर सुरळीत घेण्यात आले. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पेपरमध्ये तांत्रिक चुका होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या प्रकाराने विद्यार्थ्यांना मनस्ताप होतो आहे. यातूनच सोमवारी एमए अभ्यासक्रमाच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांनी लॉगइन केले असताना त्यांना ॲपवर "नो परीक्षा शेड्यूल नाऊ" असे दिसून आले. 

अधिक माहितीसाठी - श्वास घेण्यास त्रास होतोय? घाबरू नका पुढील उपाय करा आणि घ्या मोकळा श्वास
 

परीक्षेच्या तयारीनंतर ऐनवेळी विद्यार्थ्यांना असे दिसल्याने विद्यार्थी बुचकळ्यात पडले. दुसरीकडे ॲपमध्ये लॉगइन केल्यावर जो पेपर द्यायचा आहे, तो पेपर निवडावा लागतो. मात्र, लॉगइन केल्यावर विद्यार्थ्यांना पेपरच दिसत नसल्याच्या तक्रारी विद्यापीठाकडे आल्यात.

मात्र, विद्यापीठाकडून तयार करण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर विद्यार्थ्यांना प्रतिसाद मिळाला नाही. दुसरीकडे विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून दुसऱ्यांदा लॉगइन करा असा सल्ला देण्यात आला. याशिवाय पेपर दिल्यावर तो सबमिट करण्यासाठी विद्यार्थ्यांना बरीच मेहनत करावी लागली.

परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. विद्यापीठाच्या नियमांनुसार जे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले ते त्यांच्या महाविद्यालयात अर्ज करू शकतात आणि पुन्हा परीक्षा देऊ शकतात. 

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: name of the paper in not schedule the confusion of Nagpur University