शेतकऱ्यांसाठी मजुरानेही दिले पैसे

MAHIL UDHYOGIKA MELA
MAHIL UDHYOGIKA MELA

नागपूर : "नाम' फाउंडेशन स्थापन केल्यानंतर शेतकऱ्यांसाठी चार महिन्यांत गरीब नागरिकांनी साठ कोटी रुपये दिले. मजुरानेही पैसे दिले. मदत करण्याची जाणीव होणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक बाबीसाठी सरकारवर अवलंबून राहाणे चुकीचे असून उद्योजक होऊन नोकऱ्या निर्माण करा, असे आवाहन अभिनेते नाना पाटेकर यांनी आज उद्योजिका मेळाव्यात केले.

महापालिकेचा समाजकल्याण विभाग, महिला व बालकल्याण समितीतर्फे रेशीमबाग मैदानावर आज उद्योजिका मेळाव्याचे केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, नाना पाटेकर यांच्या विशेष उपस्थितीत थाटात उद्‌घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर संदीप जोशी होते. व्यासपीठावर उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, सत्तापक्षनेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, सेनेचे गटनेते किशोर कुमेरिया, महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गिऱ्हे, उपसभापती दिव्या धुरडे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, माजी महापौर नंदा जिचकार, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, नगरससेवक हरीश दिकोंडवार, नगरसेविका विरंका भिवगडे, प्रगती पाटील, माजी आमदार डॉ. मिलिंद माने यांच्यासह समिती सदस्य व अधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले, लोकसंख्या वाढली असून आता सरकारी नोकऱ्या शिल्लक नाही. जमेल ते करावे, नोकरी देणारे व्हावे. शेतकरी असल्याचा मला आनंद आहे. शेतातून पीक उगवताना खूप कष्ट पडतात. शेतीतील थोडेही उत्पन्न निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्याचे दुःख मोठ असते. थोडे पैसेही तिजोरीत ठेवणारी माणसं आहेत. शेतकरी अख्खे पीक उघड्यावर ठेवतो. कधी निसर्ग ते चोरून नेतो. पण, काही भाव नाही. प्रत्येक वस्तूचा दर निश्‍चित आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या मालालाच भाव नाही. ते ठरलेलंच नाही, अशी खंत व्यक्त करीत भाजीविक्रेत्याकडे मोलभाव करणाऱ्यांबाबत चीडही त्यांनी व्यक्त केली. चित्रपट, नाटकासाठी जेवढे पुरस्कार मिळाले, त्यापेक्षा जास्त समाधान शेतकऱ्यांसाठी काम करताना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक संगीता गिऱ्हे यांनी केले.

गडकरींचे केले कौतुक
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्त्व आहे. यशाची खात्री नसताना त्यांनी विविध उपक्रम सुरू केले. ते यशस्वी केलेत. त्यासाठी जिद्द लागतेच, शिवाय तशी माणसे तयार करावी लागतात. कमालीची बाब म्हणजे प्रत्येक माणसाला ते करावेसे वाटते, जे केंद्रीयमंत्री गडकरी करतात. अशी माणसे तयार होणे गरजेचे आहे, असे नमूद करीत त्यांनी गडकरींचे कौतुक केले.

लोकसहभागातून उत्पादन करा
मध्यम, लघू व सूक्ष्म उद्योग खाते माझ्याकडे आहे. या खात्याकडे मोठा निधी आहे. या विभागाच्या विविध योजनांचा फायदा घेऊन गरीब, महिलांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक प्रभागात या खात्यातर्फे महिला बचतगटांचे संमेलन करा, असा सल्ला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी महापालिकेला दिला. महिला बचतगटांना कर्जही उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

अध्यक्षीय भाषणच नाही
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर संदीप जोशी होते. दरवर्षी अध्यक्षीय भाषणातून उद्योजिका मेळाव्यामागील भूमिका महापौर स्पष्ट करीत असते. परंतु, आजच्या कार्यक्रमात संचालन करणाऱ्या महिलेने भाषणासाठी महापौरांचे नाव पुकारले. परंतु, महापौरांनी भाषण करण्याऐवजी मेळाव्याला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे पहिल्यांदाच उद्योजिका मेळाव्यात महापौरांचे भाषण झाले नाही.

महिलांचा गौरव
दरवर्षीप्रमाणे विविध क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या पाच महिलांचा नाना पाटेकर व नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यात चित्रकलेच्या क्षेत्रातील प्रा. ज्योती हिजेब, लहान मुलांच्या डोळ्यांची निःशुल्क तपासणी करणाऱ्या डॉ. सुवर्णा बालधे, इंटेरिअर सुनीता गांधी, विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या ममता जैस्वाल, ऍथलेटिक्‍समध्ये पदके मिळविणारी अश्‍विनी विटाळकर यांचा समावेश आहे.

दिव्यांग बचतगटांना अर्थसाहाय्य
दिव्यांगांना व्यवसायाकरिता अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत 40 लाख सहा हजार 571 रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. दिव्यांग विकास पुरुष बचतगट, दिव्यांग स्वाभिमान पुरुष बचतगट, भवानी स्वयंसहायता दिव्यांग महिला बचतगट, पाऊल पुरुष अपंग बचतगट यांना तसेच 12 जणांना वैयक्तिक अर्थसाहाय्याचे धनादेश देण्यात आले. 26 जणांना मोटोराईज्ड ट्रायसिकल कर सहा दिव्यांगांना ट्रायसिकल देण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com