नागपुरातील आरोग्यसेवेसाठी केंद्राकडे एक हजार कोटींची मागणी करा - नाना पटोले

निलेश डोये
Sunday, 4 October 2020

नाना पटोले यांनी नागपुरातील मृत्यूदर का वाढला? याबाबत शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हैदराबाद हाऊस येथे आढावा घेतला. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि एम्स या यंत्रणेला बळकट करण्यासाठी केंद्र शासनाकडे एक हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.

नागपूर : नागपुरात सप्टेंबरच्या मध्यात मृत्यूदर वाढला होता. आता तो कमी होत आहे. तरीही ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी केंद्र शासनाकडे एक हजार कोटींच्या निधीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. तसेच यासाठी स्वतःही पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. 

नाना पटोले यांनी नागपुरातील मृत्यूदर का वाढला? याबाबत शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हैदराबाद हाऊस येथे आढावा घेतला. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि एम्स या यंत्रणेला बळकट करण्यासाठी केंद्र शासनाकडे एक हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. या बैठकीत आमदार विकास ठाकरे, आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव जयस्वाल, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, मनपा अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर व आरोग्य यंत्रणेतील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

नागपूरमधील मृत्यूदर का वाढला? याची कारणे पटोले यांनी यावेळी जाणून घेतली. अशावेळी धर्मदाय हॉस्पिटल काय करताहेत? असा प्रश्न उपस्थित करीत, गेल्या सहा महिन्यात कोरोना संदर्भात या रुग्णालयांनी गरिबांच्या सेवेसाठी काय केले, या बद्दलचा अहवाल सादर करण्याचे निर्देशित केले. रुग्णालयाच्या दारावर खासगी सुरक्षारक्षकांनी डॉक्टरांच्या आधी रुग्णांना हाकलून लावल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत पोलिसांनी लक्ष वेधण्याचे निर्देश त्यांनी दिले. अशा पद्धतीची बाउंसर संस्कृती नागपूरमध्ये रुजू होता कामा नये, असेही त्यांनी पोलिसांना सांगितले. बिलांच्या तक्रारी व खाटांच्या उपलब्धतेबाबत ०७१२-२५६७०२१ या क्रमांकावर माहिती घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. 

८८ खासगी रुग्णालयांची तपासणी - 
कोरोनाबाधितांवर खासगी रुग्णालयात केलेल्या उपचारासंदर्भात जादा देयक आकारत असल्याच्या तक्रारीची दखल घेतली. तसेच रुग्णांवर केलेल्या उपचारासाठी राज्य शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त आकारणी केलेल्या ८८ रुग्णालयाची तपासणी करण्यात आली. रुग्णालयांना ३६ लाख रुपये परत करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी दिली. 

संपादन - भाग्यश्री राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nana patole commented on corona situation and health system in nagpur