बिहारमध्ये नागपूरचा डंका; फडणविसांचे डावपेच ठरले यशस्वी

राजेश चरपे
Wednesday, 11 November 2020

देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात जाणार असल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली.

नागपूर ः बिहार विधानसभा निवडणुकीचा कौल स्पष्ट झाला असून भाजप सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून येथे उदयास आला आहे. या यशात नागपूरकराचा वाटा मोठा असून निवडणूक प्रमुख म्हणून माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आलेख आणखी उंचावला आहे.

देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात जाणार असल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली. त्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले. प्रत्यक्षात फडणवीस यांनी यास नकार दिला होता. 

सविस्तर वाचा - टूथपेस्ट'वरील रंगीत पट्ट्यांचा अर्थ तरी काय?

मात्र आता बिहारमध्ये भाजपला खणखणीत यश मिळाल्याने त्यांचे राष्ट्रीय राजकारणात चांगलेच वजन वाढणार असल्याचे बोलले जाते. नगरसेवक, महापौर, आमदार, प्रदेशाध्यक्ष आणि थेट मुख्यमंत्री असा फडणवीसांचा राजकीय प्रवास सुरू आहे. आता बिहारच्या विजयाने तो राज्याच्या पलीकडे गेला आहे. बिहारमध्ये सुरुवातीला मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विरोधात असंतोष खदखदत असल्याचे चित्र होते. 

भाजपलाही त्याचा फटका बसले असे तर्क व्यक्त केल्या जात होते. मात्र मोदी यांनी फडणवीस यांना नेमून योग्य निर्णय घेतला. जागा वाटपाचा ताळमेळ घालताना फडणवीस यांनी दोन्ही पक्षामध्ये कुठलाही वाद होऊ दिला नाही. 

अतिशय शांतपणे प्रचाराला सुरुवात केली. काही मित्रपक्षांनाही सन्मानजनक जागा दिल्या. चिराग पासवान यांच्याबाबत अधिक भाष्य न करता त्यांच्या उमेदवारांची योग्य ठिकाणी पेरणी केली. निवडणुकीचा निकाल बघता भाजपचे नियोजन एकदम योग्य होते हे आता स्पष्ट झाले आहे. बिहारमधील भाजपच्या यशात मोदी, शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांचेही नाव जोडले जाणार आहे. यानिमित्ताने नागपूरचेही नाव उंचावणार आहे.

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

शहरासाठी अभिमानाची बाब

दुसरीकडे काँग्रेसनेसुद्धा नागपूरकर असलेले राष्ट्रीय महासचिव अविनाश पांडे यांच्यावर बिहार निवडणुकीची जबाबदारी सोपविली होती. ते सुद्धा पाच वर्षे आमदार होते. राज्यसभेत होते. अनेक वर्षांपासून राष्ट्रीय राजकारणात आहेत. बिहारच्या आधी ते राजस्थानचे प्रभारी होते. त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही. मात्र नागपूरचे नेते राष्ट्रीय राजकारणात चमकदार कामगिरी करीत आहेत, ही सुद्धा शहरासाठी अभिमानाची बाब आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NDA wins Bihar election due to strategies of devendra fadanvis