पहिल्या दिवशी फक्त २२.५ टक्के विद्यार्थी हजर, प्रवेशापूर्वी विद्यार्थी अन् शिक्षकांची स्क्रिनिंग

नीलेश डोये
Thursday, 28 January 2021

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ५ वी ते ८ वीपर्यंतच्या १७८८ वर शाळा असून, १ लाख ५० हजार ७१७ विद्यार्थी शिक्षण घेतात, तर १० हजार ६२७ शिक्षक कार्यरत आहेत. आज पहिल्या दिवशी एकूण विद्यार्थी संख्येच्या केवळ २२.५ टक्के म्हणजेच ३३ हजार ९१६ विद्यार्थीच उपस्थित होते.

नागपूर : पहिल्या टप्प्यात ९ वी ते १२ वी चे वर्ग सुरू केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात म्हणजे बुधवारपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील इयत्ता ५ ते ८ वीचे वर्ग सुरू झालेत. पहिल्याच दिवशी केवळ २२.५ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. 

हेही वाचा - युट्यूब बघितले अन् सूचली भन्नाट आयडिया, घरीच फक्त १५ रुपयांत तयार करतोय गावरानी कोंबडीचे पिल्लू

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ५ वी ते ८ वीपर्यंतच्या १७८८ वर शाळा असून, १ लाख ५० हजार ७१७ विद्यार्थी शिक्षण घेतात, तर १० हजार ६२७ शिक्षक कार्यरत आहेत. आज पहिल्या दिवशी एकूण विद्यार्थी संख्येच्या केवळ २२.५ टक्के म्हणजेच ३३ हजार ९१६ विद्यार्थीच उपस्थित होते. तर १ लाख १६ हजार ८०१ विद्यार्थी शाळेत आलेच नाहीत. ५८५४ शिक्षकच आज पहिल्या दिवशी शाळेमध्ये उपस्थित होते. कोरोनाची लागण झाल्याने ६५ शिक्षकांना शाळेमध्ये आले नाहीत. शासनाच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमती पत्र देखील भरून घेतले. जिल्ह्यातील १ लाखांवर पालकांनी पाल्याला शाळेत पाठविण्यास संमती दर्शविली नसल्याचे दिसून येते.

हेही वाचा - देशातील शासकीय रुग्णालयात लठ्ठपणावर पहिली शस्त्रक्रिया नागपुरात; १८७ किलोचा माणूस झाला ८२ किलोचा

प्रादुर्भावाच्या धर्तीवर शाळा सुरू असताना जि.प.च्या शिक्षण विभागाकडून शाळांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. शाळेत विद्यार्थी आल्यावर त्याचा वर्गात प्रवेश होण्यापूर्वीच सर्व शाळेच्या व्यवस्थापनाकडून विद्यार्थी-शिक्षकांचे तापमान मोजले. याशिवाय हातावर सॅनिटायझर देऊनच त्यांना वर्गात प्रवेश देण्यात आला. विशेष म्हणजे सर्वाधिक विद्यार्थी असलेल्या नागपूर तालुक्यातील २९२ शाळांमध्ये केवळ २३८० म्हणजेच ८.०५ टक्के विद्यार्थी उपस्थित राहिले. २७१८४ विद्यार्थी शाळेतच आले नाहीत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nearby 25 percentage student present in school on first day in nagpur