देशातील शासकीय रुग्णालयात लठ्ठपणावर पहिली शस्त्रक्रिया नागपुरात; १८७ किलोचा माणूस झाला ८२ किलोचा

केवल जीवनतारे
Thursday, 28 January 2021

लठ्ठपणामुळे ४४ टक्के लोकांना मधुमेह होण्याची शक्यता आहे. २३ टक्के लोक हृदयरोगामुळे तर ७.४१ टक्के लोक कॅन्सरला बळी पडतात. मेडिकलमध्ये दर दिवसाला पाच लठ्ठपणाचे रुग्ण येतात. यातील एकाला बॅरियाट्रिक सर्जरीची गरज पडते.

नागपूर : भारत लठ्ठपणाशी संबंधित आजारात जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. लठ्ठपणा आजार आहे, हे लोकांना माहीतच नाही. त्याकडे दुर्लक्ष करतात, प्रसंगी मृत्यूला सामोरे जातात. ही बाब लक्षात घेत मेयो, मेडिकलमध्ये सर्जरी विभागात लठ्ठपणा कमी करणाऱ्या (बॅरिएट्रिक सर्जरी) शस्त्रक्रियांचा विभाग सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत तब्बल ७०० जणांचा लठ्ठपणा कमी करण्यात मेडिकल-मेयोला यश आले आहे. राज्यातील नव्हे तर देशातील शासकीय रुग्णालयात लठ्ठपणावर पहिली शस्त्रक्रिया नागपुरात झाली आहे. याचे श्रेय मेडिकल शल्यक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. राज गजभिये यांना जाते.

जंक फूड, अल्कोहोलचे वाढते प्रमाण व अयोग्य जीवनशैलीमुळे पाचपैकी एक पुरुष किंवा स्त्री लठ्ठपणाच्या विळख्यात सापडला आहे. वजन वाढल्यामुळे मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, आर्थ्रायटिस, कॅन्सर अ‍ॅथरोस्केरासिस असे आजार शरीराला घेरतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार २.८ दशलक्ष प्रौढ व्यक्ती लठ्ठपणाच्या कारणाने दरवर्षी मरण पावतात.

अधिक माहितीसाठी - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

लठ्ठपणामुळे ४४ टक्के लोकांना मधुमेह होण्याची शक्यता आहे. २३ टक्के लोक हृदयरोगामुळे तर ७.४१ टक्के लोक कॅन्सरला बळी पडतात. मेडिकलमध्ये दर दिवसाला पाच लठ्ठपणाचे रुग्ण येतात. यातील एकाला बॅरियाट्रिक सर्जरीची गरज पडते.

याची दखल त्यावेळी मेयोच्या शल्यक्रियाविभागाचे प्रमुख डॉ. राज गजभिये यांनी घेऊन २०११ मध्ये पहिली बेरियाट्रिक शस्त्रक्रिया मेयोत केली. यानंतर सातत्याने गरिबांच्या लठ्ठपणाच्या ते शस्त्रक्रिया करीत आहेत. मेयो व मेडिकलमध्ये आतापर्यंत त्यांनी ७०० वर बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया केल्या आहेत.

१८७ किलोचा जड माणूस झाला, ८२ किलोचा

मेडिकलमध्ये बेरियाट्रिक सर्जरी झाल्या आहेत. यात सर्वाधिक वजनाच्या म्हणजे १८७ किलो वजनाच्या पुरुष होता. त्यांच्यावर झालेली यशस्वी बेरियाट्रिक सर्जरी महत्त्वाची ठरली. सद्या या पुरुषाचे वजन ८२ किलो आहे. या शस्त्रक्रियेमुळे तब्बल १०५ किलो वजन कमी झाले होते. सद्या ते सामान्य जीवन जगत असल्याचे डॉ. गजभिये यांनी सांगितले.

अधिक वाचा - पुलगावरून नागपूरला निघाले कुटुंब, पण वाटेतच मायबापांसह नवऱ्यावर काळाचा घाला

लठ्ठपणाची शस्त्रक्रिया नि:शुल्क
कोरोनाकाळात बॅरियाट्रिक सर्जरी थांबल्या होत्या. आता अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात पुन्हा सर्जरी सुरू झाल्या आहेत. लठ्ठपणाची शस्त्रक्रिया नि:शुल्क होत आहेत. विदर्भाल लठ्ठ रुग्णांना या शस्त्रक्रिया वरदान ठरत आहेत. श्रीमंतच नव्हे तर गरिबांचीही लठ्ठपणातून सुटका मेडिकलमध्ये होते. 
- डॉ. राज गजभिये,
विभागप्रमुख, सर्जरी विभाग, मेडिकल नागपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Obesity reduction in seven hundred medical patients