युट्यूब बघितले अन् सूचली भन्नाट आयडिया, घरीच फक्त १५ रुपयांत तयार करतोय गावरानी कोंबडीचे पिल्लू

youth made hatcher machine for chicken in ner of yavatmal
youth made hatcher machine for chicken in ner of yavatmal

नेर (जि. यवतमाळ) :  वेळोवेळी नवनवीन लहान-मोठे शोध गावातील मातीतून जन्माला आल्याचे आपण ऐकतो व पाहतो. अशाच एका ग्रामीण भागातील केवळ बारावी शिकलेल्या रँचोने अत्यंत कमी किंमतीत अंडी उबवण्याचे यंत्र विकसित केले असून यातून पिले तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

आकाश खुशालराव ठाकरे (वय 25, रा. सोनखास), असे या रँचोचे नाव आहे. वडिलांचा पोल्ट्री फार्मचा व्यवसाय आहे. आकाश कोंबड्यांसोबतच लहानाचा मोठा झाला. व्यवसायातील बारकावे त्याने वडीलांकडून टिपले. वडिलांनी पाचशेपासून सुरुवात करत आज चौदा हजार पक्ष्यांपर्यंत यशस्वी मजल मारली. यात त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले. एकंदर खडतर व काटेरी वाट असलेला हा व्यवसाय या बाप-लेकांनी यशस्वीरित्या सांभाळला. व्यवसायात कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल व मृत्यू दर कसा कमी ठेवता येईल? याचाच ध्यास त्यांच्या मनी असायचा.

उत्पन्न वाढीच्या सर्व बाबी चोख केल्या. परंतु, खर्चावर आळा घातला जात नव्हता. पक्ष्यांच्या पिल्लाच्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात खर्च होत होता. त्यावर तोडगा काढण्यासाठी अंडी उबवणी यंत्र तयार करून यावर मात दिली जाऊ शकते, असे आकाशच्या ध्यानी आले. नवीन ह्याचरिज किंवा अंडी उगवण्याचे यंत्र विकत घेणे आर्थिक दृष्ट्या न परवडणारे. मग काय करावे यावर विचार सुरू झाला. आकाशने युट्युबवर यासंदर्भात सर्च करून माहिती घेतली व यवतमाळ येथील हुडके सर यांच्याकडे जाऊन इनक्यूबेटरची पाहणी केली. लगेच प्लायवूड, १०० व्हॅट लाईट, सेंसर, चेन, ह्युमिडिटी कंट्रोलर, पंखा, बारा वोल्ट बॅटरी, यूपीएस आदी साहित्यांची जुळवाजुळव केली. यामध्ये दोन यंत्र तयार करण्यात आले. यातील प्रत्येक यंत्रात ५०० अंडी ठेवण्याची क्षमता आहे. 

पहिल्या शटरमध्ये ३७ ते ३७.७ अंश सेल्सिअस तापमान मेंटेन केले जाते. यात ७५ ते ८५ आद्रता राखली जाते. या यंत्रात १८ दिवस अंडी ठेवली जातात. दर दोन तासांनी टर्नरच्या सहाय्याने अंड्यांना फिरविले जाते. ज्याप्रमाणे कोंबड्या अंडी घोळतात टर्नर त्याप्रमाणे काम करतो. यानंतर ही सर्व अंडी दुसऱ्या हॅचरी यंत्रात पुढील तीन दिवसासाठी ठेवली जातात. यात तापमान ८५ ते ९५ डिग्री तर आद्रता ८५ ते ९५ डिग्री राखली जाते. यानंतर २२ व्या दिवशी अंड्यातून गोंडस पिल्ले बाहेर येतात. ऋतू परत्वे तापमान वेगवेगळे ठेवले जाते. मागील चार महिन्यांपासून यशस्वीपणे यातून पिल्ले तयार केले जात आहे. याआधी हैदराबादी पिल्लू वीस ते पंचवीस रुपयाला विकत आणावे लागत होते व गावरानी पक्ष्यांचे पिल्लू तीस ते पस्तीस रुपयाला पडत होते. या यंत्रामुळे यात मोठी बचत होऊन केवळ दहा रुपयात हैदराबादी पिल्लू तयार होत आहे, तर पंधरा रुपयात गावरानी पिल्लू तयार होत आहे. या यंत्रामुळे बचतीच्या अर्थकारणात भर पडली असून एका ग्रामीण भागातील सर्वसाधारण कुटुंबातील मुलाच्या इच्छाशक्तीच्या जोरावर यंत्रातून जीवनिर्मिती हा अद्भुत प्रवास शक्य झाला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com