आता खरी गरज पोस्ट कोविड सेंटरची

केवल जीवनतारे
Saturday, 17 October 2020

कोरोनामुक्तांचे हे प्रमाण बघता पोस्ट कोविड सेंटर त्वरित उभारण्याची गरज आहे. या रुग्णांवर उपचारासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने राज्यातील १८ शासकीय वैद्याकीय महाविद्याालय व रुग्णालयांत पोस्ट कोव्हिड केअर सेंटर अंतर्गत स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग तयार केले आहेत. नागपूरच्या एम्समध्येही हा सोय आहे. विशेष असे की, काही खासगी रुग्णालयांनी पोस्ट कोविड सेंटर उभारले आहेत. मात्र अद्याप सार्वजनिक आरोग्य विभागाला पोस्ट कोविड सेंटर उभारण्याचे सूचले नाही.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची व्यथा ..

-वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतली आघाडी, महापालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग सेंटरबाबत उदासीन 

 
नागपूर : कोरोनाचा निर्दयी खेळ महाराष्ट्राने अनुभवला. कोरोनाचा सर्वाधिक विळखा राज्यातील पुणे, मुंबई, औरंगबादसह नागपूर या मोठ्या शहरांना बसला आहे. राज्यात १६ ऑक्टोंबरपर्यंत १६ लाखाजवळ कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला मात्र या तुलनेत कोरोनावर मात करणाऱ्यांचा टक्काही वाढला. ८५ टक्के कोरोनाच्या रुग्णांनी कोरोनाला हरवले. कोरोनामुक्तींतर रुग्णांना ह्दयपासून तर फुफ्फूस आणि मेंदूच्या समस्या जाणवू लागल्याचे वैद्यकिय क्षेत्र सांगते. परंतु कोरोनानंतरच्या उपयोजनांबाबत वैद्यकीय शिक्षण आण सार्वजनिक आरोग्य विभागात समन्वय नसल्याचे दिसून येते. यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाने पोस्ट कोविड सेंटर सुरू केले, तर सार्वजनिक आरोग्य विभागासह महापालिकेचा आ रोग्य विभाग या सेंटरबाबत उदासीन असल्याची माहिती पुढे आली आहे. 

कोविडमधून बरे झाल्यानंतर देखील अनेक रुग्णांना विविध शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेकांना फुप्फुस, किडनी आणि हृदयाचे विकार जडत आहेत, तर काहींना मानसिक आजार होत आहेत. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी आता राज्यातील सर्वच वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाशी संबधित जिल्हा,उपजिल्हा तसेच ग्रामीण रुग्णालयात पोस्ट कोविड सेंटर निर्माण करण्याची गरज आहे. नागपुरातील मेडिकलमध्ये पहिले पोस्ट कोविड सेंटर महिनाभरापुर्वी उभारण्यात आले असून येथे पोस्ट कोविड बाह्यरुग्ण विभागही उभारला. मात्र सार्वजनिक आरोग्य विभागाशी संबधित रुग्णालये मात्र पोस्ट कोविड सेंटरपासून अद्यापही दूर आहेत. यामुळे राज्य शासनाच्याच वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग आणि सार्वजनिक आरोग्य या दोन विभागात दोन वेगवेगळ्या भूमिका बघायला मिळत असल्याचे दिसून येत आहे. 

त्यांच्या बोनस आयुष्याला कशाची आहे प्रतीक्षा...वाचा - 

आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार राज्यात १४ ऑक्टोंबरपर्यंत करोनाचे एकूण १५ लाख ५४ हजार ३८९ बाधित रुग्णांची संख्या आहे. दोन दिवसात किमान पन्नास हजाराने आकड्यात वाढ होईल. सुमारे १६ लाख कोरोनाबाधितांची संख्या असेल. यातील १४ लाख व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असल्याचीही नोंद आहे. तर कोरोनावरीलव उपचारादरम्यान ४२ हजार (२.६३ टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर विजय मिळवल्यानंतर बरे झालेल्या रुग्णांना विविध शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेकांना किडनी, फुप्फुस, मेंदू आणि हृदयाचे विकार जडत आहेत, तर काहींना मानसिक आजार होत आहेत. काहीना फुफ्फुसात फायब्रोसिस, लवकर थकवा येणे अशा समस्यांना सामोरे जावा लागत आहे.

कोरोनामुक्तांचे हे प्रमाण बघता पोस्ट कोविड सेंटर त्वरित उभारण्याची गरज आहे. या रुग्णांवर उपचारासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने राज्यातील १८ शासकीय वैद्याकीय महाविद्याालय व रुग्णालयांत पोस्ट कोव्हिड केअर सेंटर अंतर्गत स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग तयार केले आहेत. नागपूरच्या एम्समध्येही हा सोय आहे. विशेष असे की, काही खासगी रुग्णालयांनी पोस्ट कोविड सेंटर उभारले आहेत. मात्र अद्याप सार्वजनिक आरोग्य विभागाला पोस्ट कोविड सेंटर उभारण्याचे सूचले नाही. यासंदर्भात आरोग्य विभागाच्या सचिवांशी संपर्क साधला, परंतु सपंर्क होऊ शकला नाही. नागपूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयाशी संपर्क साधला असता, नाव न सांगण्याच्या अटिवर पोस्ट कोविड सेंटरची सुविधा अद्याप उपलब्ध झाली नसल्याचे सांगण्यात आले. 

पोस्ट कोविड सेंटरमध्ये हव्यात या सुविधा 

राज्यात मेडिकल कॉलेजमध्ये सेंटर उभारले, मात्र सार्वजनिक आरोग्य विभागात अद्ययावत पोस्ट कोविड सेंटर उभारण्यात यावे. या ठिकाणी कोरोनामुक्त झाल्यानंतर रुग्णांना जाणवणाऱ्या अनेक लक्षणांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी नेमण्यात यावा. कोरोनामुक्त रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी तसेच कोरोनाच्या काळातील कटू अनुभवातून बाहेर काढण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे. याशिवाय आहारतज्ज्ञ, योगतज्ज्ञ, समुपदेशक, फिजिओथेअरपिस्ट यांच्यासह या सुविधा पोस्ट कोविड सांटरेमध्ये असणे आवश्यक आहे. समुपदेशन सेंटर अशा सर्व अद्ययावत अशा औषधोपचार्चाय सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असे कोरोनावर उपचार करणारे वैद्यक तज्ञ सांगत आहेत. 

 

कोरोनातून बरे झालेल्यांसाठी पोस्ट कोविड सेंटरची गरज आहे. कोरोनामुक्तांच्या आरोग्य बाबतच्या समस्यांची माहिती घेणे पुण्यात आरोग्य विभागाने सुरू केले आहे. लवकरच राज्यभरातील डाटाबेस तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच पोस्ट कोविड सेंटर तयार करण्यात येतील. सध्या कोरोनातून बरे झालेल्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास त्यांना उपचार मिळवून देण्यासाठी आरोग्य विभागाच्या रुग्णालयांत उपचार होत आहेत. 
-डॉ. अर्चना पाटील, आरोग्य संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र्


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Need Post Covid Center