डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी नागपुरात तब्बल ५१५ जणांना कोरोनाची बाधा; २४ तासांत ९ मृत्यू

केवल जीवनतारे 
Tuesday, 1 December 2020

यामुळे बाधितांचा एकूण आकडा १ लाख १२ हजार २८० वर पोचला आहे. कोरोनाबाधितांमुळे आतापर्यंत ३ हजार ६८१ मृत्यूंची नोंद झाली आहे. विशेष असे की, बाहेर जिल्ह्यातून आतापर्यंत ६९४ रुग्णांना रेफर करण्यात आले

नागपूर ः मागील महिनाभरात एकाच दिवशी पाचशे कोरोनाबाधित आढळले नाही. मात्र डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी (मंगळवार) ५१५ नवीन बाधितांची भर पडली. तर २४ तासांमध्ये ९ जण दगावले आहेत.

यामुळे बाधितांचा एकूण आकडा १ लाख १२ हजार २८० वर पोचला आहे. कोरोनाबाधितांमुळे आतापर्यंत ३ हजार ६८१ मृत्यूंची नोंद झाली आहे. विशेष असे की, बाहेर जिल्ह्यातून आतापर्यंत ६९४ रुग्णांना रेफर करण्यात आले. यापैकी ५१२ जण दगावले आहेत. रेफर करण्यात आलेल्या कोरोनाबाधितांचे ७० टक्के मृत्यू नोंदविले गेले आहेत. जिल्ह्यात ऑक्टोबर २०२० च्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये बाधितांसह मृत्यूचा टक्का बऱ्याच अंशी खाली घसरला आहे. मात्र डिसेंबरमध्ये पहिल्याच दिवशी बाधितांचा आकडा वाढल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे. 

जाणून घ्या - हृदयद्रावक! बेपत्ता सव्वा महिन्याच्या बाळाचा मृतदेहच घरच्या विहिरीत तरंगताना आढळला

परंतु मृत्यूची संख्या कमी झाल्याने दिलासाही मिळाला आहे. मंगळवारी जिल्ह्यात सुमारे ४ हजार ९९२ चाचण्या झाल्या आहेत. यातील ४ हजार ४५७ जण निगेटिव्ह आले आहेत तर ५१५ बाधित आढळून आले. २ हजार ६१२ चाचण्या या खासगीत झाल्या आहेत. यातील २४७ जण कोरोनाबाधित आढळले.मेयो, मेडिकलमध्ये होणाऱ्या चाचण्यांची संख्या मात्र घटली आहे. एम्समध्ये अवघ्या १४६ चाचण्या झाल्या असून ४४ जणांमध्ये कोरोनाचा अंश आढळून आला. तर मेयोत ३४९ मेडिकलमध्ये २४८ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. 

मेडिकलमध्ये ६५ तर मेयोत ३८ जण बाधित आढळले. माफसू १५ तर निरीमध्ये ५६ जणांना कोरोना झाल्याचे आढळून आले. जिल्ह्यात मंगळवारी ९ जण दगावले असून शहरातील ३ तर ग्रामीण भागातील २ जण दगावले आहेत. जिल्ह्याबाहेरचे ४ जण दगावले आहेत. मेडिकलमध्ये आतापर्यंत १४४० मृत्यू झाले आहेत. तर मेयोत १२७३ जण कोरोनाने दगावले. ९१५ पेक्षा अधिक जण खासगीत दगावले आहेत. 

सध्या गृहविलगीकरणात ३ हजार ४८७ रुग्ण आहेत. तर रुग्णालयात सुमारे १५४७ जण दाखल करण्यात आले आहेत. २९५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आतापर्यंत कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या १ लाख ३ हजार ५६६ नोंदविली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ७ लाख ८९ हजार ५८ चाचण्या झाल्या आहेत.

क्लिक करा - War and Peace' : आत्महत्येच्या काही तासांपूर्वी डॉ. शीतल आमटेंचे ट्विट; नेमके काय सांगायचे होते 'बाबां'च्या नातीला?

नोव्हेंबरमध्ये २५८ मृत्यू

११ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण नागपुरात आढळला.यानंतर पहिला मृत्यू नागपुरात एप्रिलमध्ये नोंदवला गेला. यानंतर सर्वाधिक मृत्यू सप्टेंबरमध्ये झाले. यानंतर ऑक्टोबरपासून कोरोनाच्या मृत्यूसंख्येत घट झाली दिसून येत आहे. नोव्हेंबर२०२० मध्ये ८ हजार ९७६ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याची नोंद करण्यात आली आहे. तर यातील २५८ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचे आतापर्यंतचे मृत्यू

-एप्रिल -२ मृत्यू
-मे -९ मृत्यू
-जून -१४ मृत्यू
-जुलै -९३ मृत्यू
-ऑगस्ट -८६१ मृत्यू
-सप्टेंबर -१३७६ मृत्यू
-ऑक्टोबर - ६०२ मृत्यू
-नोव्हेंबर - २५८ मृत्यू

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New 595 corona positive patients today in Nagpur